पांडुरंग सांडभोर
पुणे: मुळा-मुठा संगमावर नदीच्या पूररेषेत शेकडो ट्रक राडारोडा टाकून नदीपात्र बुजविण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून बिनदिक्कतपणे सुरू आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी नदीकाठ योजना सुधारणाचे काम असताना महापालिकेच्या डोळ्यांदेखत राडारोडा टाकून त्यावर प्रशासनाकडून काहीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता नदीकाठी केलेले सुशोभीकरणही या राडारोड्याने दिसेनासे झाले आहे.
महापालिकेकडून एकीकडे पर्यावरण दिन जोमात साजरा केला जात असताना मुळा-मुठा नद्या कशा पद्धतीने राडारोडा टाकून गिळंकृत केल्या जात आहेत, याचे धक्कादायक उदाहरण संगमवाडी येथील मुळा-मुठा नदी संगमावर टाकलेल्या शेकडो ट्रक राडारोड्यावरून दिसून येत आहे. या भागात येथील स्थानिक नागरिकांच्या मालकीच्या जागा आहेत. (Latest Pune News)
मात्र, त्या पूररेषेत येत असल्याने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. त्यामुळे या जागामालकांनी या ठिकाणी खासगी ट्रव्हलचे पार्किंग सुरू केले आहे. मात्र, संगमाच्या बाजूच्या जागा खोलगट असल्याने त्या ठिकाणी पार्किंग करता येत नव्हते.
आता मात्र गेल्या काही महिन्यांत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून मोकळ्या मैदानासारखे करण्याचे काम सुरू आहे. असे असताना महापालिकेकडून एक-दोनवेळा दंडात्मक कारवाई वगळता कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नदी बुजविण्याचा उद्योग सुरूच आहे.
‘एनजीटी’चे आदेश धाब्यावर
राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) ऑक्टोबर 2019 मध्ये दोन्ही महापालिका आणि पीएमआरडी यांना नदीपात्रातील राडारोडा एका महिन्याच्या आत हटविण्याचे आदेश दिले होते. तसेच, ठोस कारवाई न केल्यास 1 कोटीचा दंड आकारण्याची चेतावणी दिली होती. त्यानंतर महापालिकेने संगमवाडीसह, डीपी रस्ता, वारजे येथून शेकडो ट्रक राडारोडा काढला होता. आता पुन्हा या ठिकाणी राडारोडा टाकून एनजीटीचे आदेश धाब्यावर बसविले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
नदी सुधारणाचे काम की राडारोडा...
महापालिकेकडून संगम ब्रिज ते बंडगार्डन यादरम्यान नदीकाठ सुधारणा योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे संगम ब्रिज येथे टाकण्यात येत असलेला राडारोडा म्हणजे नदी सुधारणाच्या कामाचा भाग असल्याचा गैरसमज होत आहे. त्यामुळे राडारोडा टाकणार्यांचे चांगलेच फावले आहे.
संगमवाडी नदीपात्राच्या पूररेषेत शेकडो नव्हे, तर हजारो ट्रक राडारोडा टाकण्यात आला आहे. याला सर्वस्वी महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. ज्या ठिकाणी राडारोडा टाकला आहे, त्या ठिकाणीच तथाकथित नदीकाठ योजनेचे काम सुरू आहे, असे असताना राडारोडा टाकण्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले? त्यामुळे संबंधित महापालिका अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी एनजीटीकडे करणार आहोत.- सारंग यादवडकर, ज्येष्ठ पर्यावरणवादी
संगमवाडी नदीपात्रात राडारोडा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढे संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल.- राजेश भुतकर, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग