मानवाकृती रोबोट, पाण्यात पोहणारे ड्रोन अन् लढाऊ विमानात स्वदेशी ऑक्सिजन File Photo
पुणे

Humanoid Robots: मानवाकृती रोबोट, पाण्यात पोहणारे ड्रोन अन् लढाऊ विमानात स्वदेशी ऑक्सिजन

पुणे शहरातून लवकरच बाहेर पडणार हे संशाधन

पुढारी वृत्तसेवा

Humanoid robot underwater drone

आशिष देशमुख

पुणे: एकट्या पुणे शहरातून अवघ्या जगाला हजारो नवोन्मेष दिले जातात. येत्या दोन वर्षांत मानवाकृती रोबोट, पाण्यात पोहणारे ड्रोन, स्वदेशी बनावटीचे जेट इंजिन, लढाऊ विमानांना लागणारा देशी ऑक्सिजन, असे नवे तंत्रज्ञान भारतासह जगाला देणार आहे.

पुण्यातून सुमारे 21 राष्ट्रीय संशोधन संस्थांतून वर्षाला किमान 1 हजार शोधनिबंध आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रसिद्ध होतात. गेल्या पाच वर्षांत सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त नवे शोध जगाला दिले आहेत. डीआरडीओ ही संरक्षण दलासाठी संशोधन करणारी संस्था 2028 पर्यंत लष्करासाठी मानवाकृती रोबोट बनवणार आहे. (Latest Pune News)

सूर्यही घेतो श्वासोच्छ्वास...

सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी सोडण्यात आलेल्या आदित्य यानातील एक पेलोड आयुका संस्थेतील शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. धगधगणारा

सूर्यदेखील श्वासोच्छ्वास घेतो, असे निरीक्षण नोंदवले आहे. सूर्याच्या पोटात हायड्रोजन बॉम्ब असून त्याचा परीघ तब्बल 7 लाख कि.मी. असून पृष्ठभागावर सहा हजार तर मध्यभागी 10 हजार अंश सेल्सिअस इतके तापमान आहे, अशी रंजक माहिती दर सहा महिन्याला येथील शास्त्रज्ञ जगाला देत आहेत. ही संस्था जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ दिवंगत डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुढाकारातून केंद्र शासनाने स्थापन झाली. तिचा नावलौकिक आता जगभरात आहे.

केसापेक्षाही 10 पट सूक्ष्म नॅनो क्रिस्टलने केली कमाल...

आयसर अर्थात राष्ट्रीय विज्ञान संस्थेची एक शाखा पुणे शहरातील पाषाण भागात आहे. येथील शास्त्रज्ञ डॉ. अतिकुर रहमान यांनी केसापेक्षा दहापट सूक्ष्म आकाराच्या नॅनो क्रिस्टलला प्रयोगशाळेत तयार केले. त्यामुळे वैद्यकीय, अवकाश तंत्रज्ञानाला मोठी मदत होणार आहे. भविष्यात असा पेन ड्राईव्ह येईल, त्याची क्षमता अगणित असेल.

महासंगणक देऊ शकतो निवडणुकांचे अचूक अंदाज

राष्ट्रीय विज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. संथानम, रितम पाल आणि अंजनेय कुमार या भौतिक शास्त्रज्ञांनी भारतासह जगातील 34 देशातील एकूण 581 निवडणुकांचे विश्लेषण केले. तसेच भारतातील 1952 ते 2019 या 67 वर्षांचे निकाल अभ्यासले. हा शोध निबंध जगात आजवर सर्वात दुर्मीळ मानला जातो. कारण अशा प्रकारचे संशोधन जागत प्रथमच झाले आहे. मतदानाची अचूक आकडेवारी मिळाली तर महासंगणकाच्या सहाय्याने काही तासांत जगातील कोणत्याही देशाच्या निवडणुकांचे अंदाज देणे आता शक्य आहे, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.

सी डॅकमध्ये बहुआयामी संशोधन

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कम्प्युटिंग (सीडॅक) या संस्थेत उच्च दर्जाचे महासंगणक तयार होत आहेत. यात मिनी महासंगणक हा नवीन प्रकार चर्चेचा विषय असून तो सी डॅकच्या पुणेसह विविध शाखांच्या मदतीने तयार होत आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित बहुआयामी कम्प्युटिंगसह आरोग्यावर स्वास्थ्य सूचना विज्ञान, सायबर सुरक्षा या विषयांवर आधारित संशोधन होत आहे.

डाएटमध्ये ड्रोनवर संशोधन

संरक्षण दलासाठी लागणारे ड्रोन तयार करण्यासाठी डीआरडीओ अंतर्गत येणारी डाएट ही संशोधन संस्था काम करत आहे. ड्रोन प्रणाली विविध हवामान परिस्थितीत प्रभावीपणे कार्य करते. सशस्त्र दलांच्या ऑपरेशनसाठी ते खूप महत्त्वाचे साधन बनल्याने हे मॉड्यूल विकसित केले आहे.

डीआरडीओचे मानवाकृती रोबोट...

ह्युमनॉईड अर्थात रोबोटची मानवाकृती तयार करण्याचे लक्ष्य पुण्यातील डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) घेतले असून सीमेवर रक्षण करण्यासाठी यापुढे युद्धात उपयोग करण्यासाठी तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. 2028 पर्यंत हा रोबोट तयार करण्याचे नियोजन आहे. मात्र यात मानवी संवेदना तसेच सद्सद्विवेकबुद्धी कशी तयार करता येईल हे मोठे आव्हान शास्त्रज्ञांपुढे आहे. यात प्रामुख्याने पुणे, बंगळूर, हैदराबाद येथील शास्त्रज्ञ काम करीत आहेत.

लढाऊ विमानांत स्वदेशी ऑक्सिजन

पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) मराठी शास्त्रज्ञ डॉ. विजय बोकाडे यांच्या टीमने झिओलाईट या रासायनिक पदार्थांच्या सहाय्याने हवेतील ऑक्सिजनची शुद्धता वाढवून पायलटसाठी लागणार्‍या ऑक्सिजनचे अस्सल स्वदेशी यंत्र तयार केले आहे. आजवर लढाऊ विमानात रशियन बनावटीचे ऑक्सिजन किट येत होते. या संशोधनामुळे आता हे किट आयात करण्याची गरज नाही. त्याची चाचणी मिग 21 या लढाऊ विमानावर पूर्ण झाली आहे. एनसीएलने यासाठी भारतीय हवाई दलासोबत सामंजस्य करार केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT