पुणे: हुबळी विमानतळाच्या कामाची वर्क ऑर्डर मिळवून प्रत्यक्षात काम अत्यंत संथगतीने आणि निकृष्ट दर्जाचे करून तसेच साहित्य पुरवठादारांची बिले परस्पर हडप करून एका बांधकाम कंपनीची २ कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात कियान इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सागर रायसोनी (वय ३८, रा. लोटस हाऊस, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कियान इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मालक कनिष्क त्र्यंबक कांबळे (रा. मुकुंद निवास, इंडियानगर, लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिष्क कांबळेने ए.टी.आर. इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीचा विश्वास संपादन करून कर्नाटकातील हुबळी विमानतळाच्या कामाची वर्क ऑर्डर मिळवली. मात्र, सुरुवातीपासूनच फसवणुकीचा हेतू ठेवून संबंधित काम अत्यंत संथगतीने सुरू केले. प्रत्यक्षात केवळ १५ ते २० टक्के काम पूर्ण केले.
तेही निकृष्ट दर्जाचे होते. कामात विलंब होण्याबाबत वेळोवेळी खोटी आणि वेगवेगळी कारणे सांगून आरोपीने कंपनीचा विश्वास कायम ठेवला. दरम्यान, हुबळी येथील साहित्य पुरवठादारांनी कामाच्या ठिकाणी पुरविलेल्या साहित्याची बिले फिर्यादींच्या कंपनीने वेळेत अदा केली होती. मात्र, आरोपीने ही रक्कम संबंधित पुरवठादारांना न देता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली.
तसेच, कंपनीला कोणतीही पूर्वकल्पना न देता काम अर्धवट सोडून दिले. कंपनीने विश्वासाने दिलेल्या पैशांचा परस्पर अपहार करून एकूण दोन कोटी ९८ लाख ९ हजार ११८ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र खैरनार पुढील तपास करीत आहेत.