HPV Vaccine pudhari
पुणे

HPV Vaccine: पालकांनो, गैरसमज महत्त्वाचा की मुलींचे आरोग्य?

एचपीव्ही लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका : आरोग्य विभागाचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये मुलींसाठी एचपीव्ही लस मोफत दिली जात आहे. मात्र, लसीकरणाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरील दिशाभूल करणारे व्हिडीओ, अपूर्ण माहिती यामुळे अनेक पालक लसीकरणाबाबत साशंक आहेत. मात्र, अफवांवर विश्वास न ठेवता पालकांनी मुलींच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

शहरात 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींसाठी 8 मार्चपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यामध्ये 30 एप्रिलपर्यंत केवळ 525 मुलींना लस देण्यात आली आहे. ही लस ट्रायल आहे, मासिक पाळीवर परिणाम होतो किंवा भविष्यात वंध्यत्व येऊ शकते, अशा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे तज्ज्ञांनी स्पष्ट स्पष्ट केले.

एचपीव्ही हा विषाणू प्रामुख्याने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी (सर्व्हायकल कॅन्सर) संबंधित आहे. या गंभीर आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरण अत्यंत प्रभावी ठरते. तरीही लस सुरक्षित आहे का, दुष्परिणाम होतील का, अशा शंकांमुळे अनेक पालक मुलींना लस देण्यास टाळाटाळ करत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिका प्रशासनातर्फे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

महापालिकेचा पुढाकार

महापालिकेने अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तज्ज्ञ डॉक्टरांचे व्हिडीओ, वैज्ञानिक माहिती आणि लसीकरणाचे महत्त्व सांगणाऱ्या मोहिमा सुरू केल्या आहेत. तसेच प्रसिद्ध व्यक्ती, लोकप्रतिनिधी आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या माध्यमातूनही नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये पूर्वी रोज अंदाजे 5 मुलींचे लसीकरण होत होते. आता ते प्रमाण 30 पर्यंत गेले आहे. हळूहळू प्रतिसाद वाढत असला तरी पालकांनी अधिकाधिक संख्येने मुलींच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यायला हवा. महापालिकेला लसीचे 20 हजार डोस मिळाले आहेत. दररोज 300 मुलींचे लसीकरण होऊ शकते. शाळांना सुट्‌‍ट्या लागल्या तरी महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये लसीकरण सुरू राहणार आहे.
- डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT