पुणे : रजोनिवृत्तीपूर्व टप्प्यावरील महिलांमध्ये पॅपिलोमा विषाणू (एचपीव्ही) संसर्गामुळे योनीतील सूक्ष्मजंतूंच्या संतुलनात लक्षणीय बदल होतात. बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या संशोधनातून हा निष्कर्ष समोर आला आहे. याबाबतचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्यासह डॉ. स्मृती शेंडे, डॉ. रश्मिता दास, डॉ. सुवर्णा जोशी, डॉ. सुषमा यनमंद्रा, डॉ. नयाबॉम ताजी यांनी केला असून, नुकताच आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.(Latest Pune News)
वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासाचे शीर्षक ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शन अँड व्हजायनल मायक्रोबियम प्रोफाईल इन प्री-मेनोपॉझल वुमेन’ असे आहे. यासाठी जानेवारी 2021 ते जून 2022 या काळात मायक्रोबायॉलॉजी विभागात करण्यात आलेल्या या अभ्यासात 20 ते 49 वयोगटातील एकूण 86 महिलांचा समावेश होता. यात एचपीव्ही संसर्गाची लक्षणे असलेल्या आणि कोणतीही जननेंद्रियाशी संबंधित तक्रार नसलेल्या अशा दोन्ही गटांतील महिलांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये पूर्वी लैंगिक संसर्ग (एसटीआय) झालेल्या, हार्मोनल थेरपी घेतलेल्या किंवा एचपीव्ही लस घेतलेल्या महिलांचा समावेश केला नव्हता.
अभ्यासात असे दिसून आले की, एचपीव्ही पॉझिटिव्ह महिलांमध्ये योनीतील संरक्षक जीवाणूंचे प्रमाण कमी आढळले; तर इतर विविध सूक्ष्मजंतूंची संख्या वाढलेली होती. या असंतुलनामुळे नैसर्गिक रोगप्रतिकारक संरक्षण कमी होते आणि एचपीव्ही संसर्ग दीर्घकाळ टिकून राहतो, ज्यामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
या अभ्यासातून एचपीव्ही संसर्ग आणि योनीतील मायक्रोबायोममधील बदल यांचा स्पष्ट संबंध दिसून आला आहे. महिलांच्या गर्भाशय मुखाच्या आरोग्यासाठी मायक्रोबायोम आधारित नवनवीन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आवश्यकता आहे.डॉ. राजेश कार्यकर्ते, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख, बीजे मेडिकल कॉलेज