पिंपरी : 'माझी मुलगी उत्कृष्ट जलतरणपटू होणार, आणि एक दिवस ती देशाचे, शहराचे आणि स्वतःचे नाव मोठे करणार, म्हणून मी तिला दररोज पोहोण्यासाठी पालिकेच्या कासारवाडीतील जलतरण तलावावर घेऊन जातो. मात्र, तेथे क्लोरीन वायू गळतीच्या घटनेनंतर पोहोण्याचे नाव काढले की, आता आमच्या मनात धस्स होते, अशी प्रतिक्रिया संजीवनीचे वडील मुकुंद कारळे यांनी व्यक्त केली. पुण्याच्या आपटे प्रशालेत इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी संजीवनी मुकुंद कारळे हिला उत्कृष्ट जलतरणपटू व्हायचे आहे.
मुलीच्या या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी वडिलांनीच तिला दोन वर्षापासून जलतरणाचे धडे देत आहेत. वडिलांनादेखील पोहोण्याची आवड असल्याने गेल्या बारा तेरा वर्षांपासून तेदेखील पोहण्याचा सराव करतात. दररोज वडील अन् मुलगी संजीवनी दोघेही सोबतच जलतरण तलावावर पोहोण्यासाठी जात होते. आगामी चौदा वर्षाखालील जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संजीवनीची तयारी सुरू आहे. स्पर्धेतील बारकावे, तांत्रिक माहितीसाठी वडिलांनी तिला प्रशिक्षकही नेमला.
मात्र, मंगळवारी सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे पोहोण्यासाठी गेल्यानंतर क्लोरिनच्या गळतीमुळे जलतरण तलाव तसेच परिसरातील सर्वांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. संजीवनी आणि तिच्या वडिलांनाही श्वसनाचा त्रास व्हायला लागला. तिच्या घशात खवखव होत होती. तिला ताबडतोब महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑक्सिजनची पातळी खालावत असल्याने, लहान मुलांसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय सामग्रीच्या अभावामुळे संजीवनीला चिंचवड येथील बिर्ला हॉस्पिलटमध्ये दाखल करण्यात आले.
येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. संजीवनीची प्रकृती ठीक झाल्यानंतर तिला तुम्ही पोहायला घेऊन जाणार का? या प्रश्नावर तिच्या वडिलांनी दोन मिनीट मौन बाळगत सुस्कारा सोडत… आता भीती वाटत आहे. तिला कसे घेऊन जाणार. मी एवढे वर्ष पोहोण्याचा सराव करतो. तरी मला श्वसनाचा त्रास झाला इथून पुढे परत कधी असे घडणार नाही, याची काय शाश्वती ! प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चिमुरड्या संजीवनीला नाहक त्रास सोसावा लागला.
क्लोरिन वायू गळतीच्या दुर्घटनेनंतर जीवरक्षकांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अनेकांचे जीव वाचविले. मात्र त्यानंतर त्यांनाही श्वसनाचा त्रास झाल्याने या सर्वांना वायसीएम रुग्णालयात दाखल करावे लागले.
या तलावात पोहोण्यासाठी सकाळी सहा आणि दुसरी बॅच सात वाजता सुरू होते. यावेळेत आलेल्या एकूण 33 नागरिकांची प्रकृती सुखरूप आहे. तिसर्या आठ वाजताच्या बॅचवेळी हा प्रसंग घडल्याची माहिती उपस्थितांनी दिली.
आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत असलेल्या महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयांत अत्याधुनिक वैद्यकीय सामग्री नाही. परिणामी या दुर्घटनेतील दहा वर्षाच्या मुलीला वायसीएम रुग्णालयामधून चिंचवड येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
जलतरण तलावातील क्लोरिनच्या गळतीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास झाला. हा वायू परिसरात पसरला. तेथील झुडपे जळून पिवळी पडली होती. या परिसरात तुरळक लोकवस्ती आहे. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी ही घटना घडली असती तर मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास झाला असता.
क्लोरीन गॅसची गळती झाल्यावर प्रत्येकाला श्वसनाचा त्रास होत असल्याचे जाणवत होते, मात्र काय घडलेय, हे कुणालाच कळाले नाही. त्या वळी जलतरण तलावाच्या व्यवस्थापकांनी अग्निशमन यंत्रणेशी संपर्क साधला त्या वेळी संबंधित अधिकार्यांनी आग कुठे लागल्याची माहिती विचारल्यावर व्यवस्थापकाने आग लागली नसून, आम्हाला श्वसनाचा त्रास होत आहे, अशी माहिती दिली. त्यावर अग्निशमन विभागाने तत्काळ सर्वांनी बाहेर येण्याचे आदेश दिले.
हेही वाचा