Loni Kalbhor Hotel Assault Video: पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. कदमवाकवस्ती (एन्जेल हायस्कूलजवळ) येथील प्रसिद्ध 'जगदंबा' हॉटेलमध्ये माजी सरपंच राहुल काळभोर आणि त्याच्या साथीदारांनी धुडगूस घातल्याचा आरोप आहे. हॉटेल मालक, त्यांचे कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली.
इतकेच नव्हे, तर काचेचे भांडे फेकून मारल्याने हॉटेल मालक जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात राहुल दत्तात्रय काळभोर याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती येथील एन्जेल हायस्कूलजवळ असलेल्या 'जगदंबा' हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. राजेंद्र चौधरी (वय ५६) हे गेल्या ३० वर्षांपासून हे हॉटेल चालवत आहेत.
घटनेच्या रात्री रामचंद्र ऊर्फ रामभाऊ दत्तात्रय काळभोर हा जेवणासाठी हॉटेलमध्ये आला होता. जेवण झाल्यानंतर त्याने ऑनलाइन पद्धतीने बिलाचे पैसे भरले. त्यानंतर त्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडे 'माझे बिल आले का?' अशी विचारणा केली. त्यावर हॉटेल मालक राजेंद्र चौधरी यांनी 'हो, तुमचे बिल जमा झाले आहे,' असे सांगितले.
मात्र, त्यानंतर रामचंद्र काळभोर याने कोणतेही कारण नसताना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हॉटेलमध्ये वाद निर्माण झाला.
हॉटेलमध्ये सुरू असलेला वाद ऐकून राजेंद्र चौधरी यांचा मुलगा मयूर चौधरी (वय २२) तेथे आला. त्याने रामचंद्र काळभोर याला समजावून सांगण्याचा आणि सुरू असलेला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रामचंद्रने मयूरलाही शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि मारहाण केली. त्यानंतर मयूरने रामचंद्रला हॉटेलच्या बाहेर काढले.
पहिल्या वादानंतर काही मिनिटांतच परिस्थिती आणखी चिघळली. रामचंद्रचा भाऊ आणि लोणी काळभोरचा माजी सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर हा स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर यांच्यासह हॉटेलमध्ये आला. चौघांनी बेकायदेशीरपणे हॉटेलमध्ये प्रवेश करत हॉटेल मालक राजेंद्र चौधरी आणि तेथील कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या मारहाणीदरम्यान स्वप्निल काळभोर याने हॉटेलच्या काउंटरवर ठेवलेले बडीशेपेचे काचेचे भांडे उचलले आणि ते थेट राजेंद्र चौधरी यांच्या तोंडावर फेकून मारले. त्यामुळे चौधरी जखमी झाले. हा प्रकार सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेले हॉटेलमधील ग्राहक दीपक कुकरेजा आणि कर्मचारी मिराज ऊर्फ शमामुल अन्सारी यांनाही आरोपींनी मारहाण केली.
हॉटेलमधील मारहाणीच्या घटनेनंतर मयूर चौधरी आणि त्याचा चुलत भाऊ ओम चौधरी हे तक्रार देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांना घटनेची माहिती देऊन ते हॉटेलच्या दिशेने परतत होते.
मात्र, हॉटेलजवळील डॉमिनोज पिझ्झा समोर आरोपींनी त्यांना पुन्हा गाठले. राहुल काळभोर, रामचंद्र काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर या चौघांनी मयूर आणि ओम यांना रस्त्यात अडवले. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.
या संपूर्ण प्रकरणी हॉटेल मालकाच्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात राहुल दत्तात्रय काळभोर, रामचंद्र ऊर्फ रामभाऊ दत्तात्रय काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.