Pune Crime : गाडीला कट मारल्याच्या किरकोळ वादातून तिन्हेवाडीत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Pune Crime : गाडीला कट मारल्याच्या किरकोळ वादातून तिन्हेवाडीत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
Published on: 
Updated on: 

राजगुरुनगर : काही दिवसांपूर्वी गाडीला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना तिन्हेवाडी (ता. खेड) येथे मंगळवारी (दि. १०) घडली. या हल्ल्यात शिवम बाळासाहेब करमारे (वय २६) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. शिवमच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर वार झाले असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी शिवमचा चुलत भाऊ आदित्य काळूराम करमारे याने दिलेल्या तक्रारीनुसार, तिन्हेवाडी येथे दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास भररस्त्यात हा हल्ला करण्यात आला. शिवम दुचाकीवरून जात असताना तिन्ही मुलांनी त्याला अडवून अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने सपासप वार केले.

यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी आरडाओरड केल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हल्लेखोरांचा माग काढून राक्षेवाडी येथून तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांनी दिली.

दिवाळी पाडव्यानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच भररस्त्यात घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे तिन्हेवाडीसह परिसरात तीव्र खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.