Ghodegaon Police Arrest Pudhari
पुणे

Share Market Fraud: शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीला घोडेगाव पोलिसांकडून अटक

कोट्यवधींचा गंडा घालणारा संशयित नवी मुंबईतून जेरबंद; 2.94 कोटींच्या फसवणूक प्रकरणाचा तपास पुढे सुरू

पुढारी वृत्तसेवा

घोडेगाव: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आणि गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या मुख्य संशयिताला घोडेगाव पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धेश मनोज काळे (वय ३७, रा. कोलदरे, ता. आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून, त्याला नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

सिद्धेश काळे याने त्याचे साथीदार गणेश दत्तात्रय गव्हाणे (रा. साल) आणि राहुल दिलीप काळे (रा. शिंदेवाडी) यांच्याशी संगनमत करून 'इडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड' या कंपनीच्या नावाचा वापर केला. फिर्यादी आणि इतर २१ साक्षीदारांना वार्षिक मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे २ कोटी ९४ लाख ६३ हजार ८०९ रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी घोडेगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून सिद्धेश काळे हा अटक टाळण्यासाठी स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होता. त्याने न्यायालयात दोनदा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक महेश पवार यांनी न्यायालयात भक्कम युक्तिवाद केल्याने त्याचे दोन्ही अर्ज फेटाळण्यात आले होते.

काळे सातत्याने आपली ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांना गुंगारा देत होता; मात्र तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे तो नवी मुंबई परिसरात असल्याची खात्री पटताच, प्रभारी अधिकारी सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नवी मुंबईत सापळा रचला आणि २० मार्च रोजी त्याला बेड्या ठोकल्या.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिद्धेश काळे किंवा त्याचे साथीदार गणेश गव्हाणे यांच्याकडून अन्य कोणाची आर्थिक फसवणूक झाली असल्यास त्यांनी तातडीने घोडेगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी केले.

ही यशस्वी कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार, पोलिस उपनिरीक्षक महेश पवार, संतोष मुळूक, महिला पोलिस हवालदार मनिषा तुरे, अक्षय वायदंडे, निलेश तळपे व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT