हिंजवडी, वाघोलीतील घरं महागडी; मुंबईतील चेंबूर, मुलुंड मधील घरे देशात महाग  Pudhari
पुणे

Pune Housing: हिंजवडी, वाघोलीतील घरं महागडी; मुंबईतील चेंबूर, मुलुंड मधील घरे देशात महाग

मागील चार वर्षांत येथील घरांच्या किंमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Property rates in Hinjewadi and Wagholi

पुणे: देशातील महानगरांमध्ये मुबंईतील चेंबूर आणि मुलुंड येथील घरे सर्वात महागडी ठरली असून, अवघ्या चार वर्षांत घरांच्या किमती 50 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. पुण्याची आयटी नगरी असलेली हिंजवडी आणि वाघोलीतील घरांच्या किमती सर्वाधिक आहेत. मागील चार वर्षांत येथील घरांच्या किंमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

देशातील बड्या 14 गृहनिर्माण क्षेत्रातील बाजारपेठेत 2021 अखेरीस ते जून 2025 या कालावधीत घरांच्या किमतीत 24 ते 139 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. चेंबूरमध्ये 2021अखेरीस घरांची किंमत प्रतिचौरस फूट 18,735 रुपये होती. त्यात जून-2025मध्ये 28,600 रुपयांपर्यंत (53 टक्के वाढ) वाढ झाली आहे. (Latest Pune News)

मुलुंडमधील घरांची प्रतिचौरसफूट किंमत 16,917 वरून 25,300 (50 टक्के वाढ) गेली आहे. पुण्याचे आयटी हब असलेल्या हिंजवडीतील घरांची किंमत 5,710 रुपये प्रतिचौरस फुटांवरून 8 हजार रुपयांवर (40 टक्के वाढ) झेपावली आहे. वाघोलीतील घरांच्या किंमती 4,951 वरून 6,940 रुपयांवर (40 टक्के वाढ) गेली आहे.

मुंबईपाठोपाठ दिल्लीत घरांच्या किंमती देशात सर्वाधिक आहेत. दिल्लीतील सोहना रस्त्यावरील घरांची प्रतिचौरस फूट किंमत 2021च्या तुलनेत जून-2025मध्ये 6,600 वरून 11,500 रुपयांवर (74 टक्के वाढ) गेली आहे. नोएडातील सेक्टर-150मध्ये घरांची किंमत 5,700 वरून 13,600 रुपयांवर (139 टक्के वाढ) गेली आहे. नवी दिल्लीतील सोहना रस्त्यावरील घरभाडे 25 वरून 37,500 रुपयांवर गेले आहेत. सेक्टर-150 मधील घरभाडे दर 16 वरून 27,300 रुपयांवर गेले आहेत. अ‍ॅनारॉक रिसर्चच्या ताज्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे.

सदनिकांचा भाडेदरही मुंबईत अधिक

सदनिकांच्या दरमहा भाडेदरातही चेंबूर आणि मुलुंड आघाडीवर आहे. चेंबूर येथील दरमहा घरभाडे 2021च्या अखेरीस 46 हजार रुपये होते. त्यात आता 67 हजार रुपयांची वाढ झाली आहे. गत चार वर्षांत घरभाडे 46 टक्क्यांनी वाढले आहे.

मुलुंड येथील घरभाडे 39,500 वरून 52,300 रुपयांवर (32 टक्के वाढ) गेले आहे. हिंजवडीतील घरभाडे 17,800 वरून 28,500 (60 टक्के वाढ) आणि वाघोलीतील घरभाडे 14,200 वरून 24 हजार रुपयांवर (69 टक्के वाढ) गेले आहे. बंगळुरूमधील भाडेदर 21 वरून 38 हजार रुपयांवर गेले आहेत. तब्बल 81 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सदनिकांचे दर वाढतेच राहतील

सदनिकांचे दर आणि भाडेदर 2026मध्ये वाढते राहतील. घरांच्या किंमती 6 ते 7 आणि घरभाडेदरात 7 ते 10 टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचे अ‍ॅनारॉकने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT