Tree Cutting Shikrapur Pudhari
पुणे

Tree Cutting Shikrapur: महामार्ग रुंदीकरणासाठी जुन्या झाडांची कत्तल!

शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा महामार्गावरील 353 झाडांची कटाई; वृक्षप्रेमींनी व्यक्त केली नाराजी

पुढारी वृत्तसेवा

टाकळी भीमा : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण दुरुस्तीचे व रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. मात्र, महामार्ग रुंदीकरणाच्या नावाखाली दोन पिढ्यांचे साक्षीदार असलेल्या शेकडो झाडांची खुलेआम कत्तल करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येकाला सावली देणाऱ्या जुन्या आणि डेरेदार झाडावर यांत्रिक कटर चालवून झाडे जमीनदोस्त करण्यात येत असल्याने वृक्षप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन राखण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून गावागावांत झाडे लावण्याची मोहीम सुरू केली आहे. झाडे लावण्याबाबत जनजागृती केली जात आहे, तर दुसरीकडे विकासाच्या नावाखाली संबंधित विभाग शेकडो वर्षे जुन्या डेरेदार झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा र्‌‍हास करीत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून केला जात आहे. संबंधित विभागाने जेवढी झाडे तोडली, नियमानुसार त्याच्या पाचपटीने झाडे लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांनी घेण्याची मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.

परिसरातील एसटी बसस्थानक, चौकातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे प्रशासनाने शांततेच्या मार्गाने हटवली. येथील दुकानदारांनी पत्र्याचे शेड स्वतःहून काढून घेतले आहेत. या मार्गावरील मागील अनेक वर्षांमध्ये घडलेल्या सर्व घटनेचे साक्षीदार असणारे वड, चिंच, कडुलिंब, निलगिरी, बाभूळ, काशीद या झाडांची तोड होताना दिसत असल्याने यासंदर्भात वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

या महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरत असलेली 353 झाडे तोडण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाने वृक्ष प्राधिकरण समितीकडे पाठवून अटी-शर्तीवर वृक्षतोडीची मंजुरी घेतली आहे. यामध्ये 353 झाडांचे जेवढे वय आहे, त्याऐवजी 18 हजार 665 झाडांची ज्यांची उंची 8 ते 10 फूट आहे, अशा झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्यासाठी जिओ ऑनलाइन टॅगिंग करून प्रतिझाड अनामत रक्कम भरलेली आहे. या वृक्षलागवडीचा अहवाल वृक्ष प्राधिकरण समितीला व महानगर प्राधिकरण आयुक्तांना पाठवण्यात येईल. या अटीवर एनएच 548 डी महामार्गावरील झाडे तोडण्याची परवानगी दिल्याची नोंद आहे. या झाडांमध्ये वड, चिंच, कडुलिंब, बोर, काशीद, साजेरी, बाभुळ, निलगिरी, पिंपळ यांचा समावेश आहे.
अनिल दळवी, प्रकल्प व्यवस्थापक, महामार्ग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT