पुणे

हवेली तालुक्यात उच्चांकी कुणबी ! शोधमोहिमेला आला वेग

Laxman Dhenge

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : हवेली (ग्रामीण) तालुक्यात कुणबी नोंद शोधमोहीम मंदावल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत समोर आले होते. या बाबत दै.'पुढारी'मध्ये नुकतेच वृत्त प्रसिद्ध झाले होते, त्याची दखल घेत प्रशासनाने शोधमोहीम वेगाने सुरू केली असून, तालुक्यात उच्चांकी कुणबी नोंदी असल्याचे पुढे आले आहे. आतापर्यंत 72 गावांतील जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये तब्बल 14 हजार 334 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तालुक्यात 130 महसुली गावे आहेत. अद्यापही 58 गावांतील जन्म-मृत्यू रजिस्टर तपासणी शिल्लक आहे. याशिवाय शिक्षण व इतर विभागांच्या दस्तावेजातही कुणबी नोंदी सापडत असल्याने तालुक्यातील कुणबी नोंदीची संख्या 25 हजारांवर वाढणार आहेत.

गावोगावच्या  ब्रिटिश राजवटीतील जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये सरसकट कुणबी जात असा उल्लेख आहे. राज्यात सर्वाधिक कुणबी नोंदी हवेली तालुक्यात असल्याचे पुढे आले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर कुणबी नोंदी शोधमोहीम वेगाने सुरू आहे. मात्र, हवेली तालुक्यात या नोंदी शोधण्यासाठी पुरेसे मोडीवाचक उपलब्ध नसल्याने शोधमोहीम मंदावली होती. कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता मोडी वाचकांची संख्या वाढवली आहे. शिक्षण विभागात 833 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. अद्यापही 58 गावांचे जन्म-मृत्यू रजिस्टर, तसेच इतर विभागांच्या दस्तावेजांची तपासणी करण्यात येणार आहे. पुण्यातील हवेली (ग्रामीण) तहसील कार्यालयात कुणबी नोंदी शोधण्यासाठी सुरू केलेल्या विशेष कक्षाच्या शोधमोहिमेचा तहसीलदार किरण सुरवसे यांनी गुरुवारी आढावा घेतला. नियोजित वेळेत शोधमोहीम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे.

मराठाऐवजी सरसकट कुणबी

राज्यात सर्वाधिक अधिक कुणबी नोंदीचा खजिना हवेली तालुक्यात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर हवेलीच्या रेकॉर्ड रूममध्ये असलेल्या गावोगावच्या जन्म-मृत्यू रजिस्टरची प्रत्यक्ष तपासणी सुरू झाली असता गावोगाव मराठा जातीऐवजी सरसकट कुणबी जातीच्या शेकडो नोंदी सापडत आहेत. एकाही दस्तात मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा म्हणून जातीचा उल्लेख नाही. जन्म-मृत्यूची नोंद करताना जातीचा उल्लेख सरसकट कुणबी म्हणून आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागात अधिक नोंद

सिंहगड किल्ल्याच्या परिसरासह पश्चिम भागातील धायरी, आंबेगाव, वडगाव, शिवणे, कोंढवे धावडे, वरदाडे, मालखेड, खडकवासला, नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, गोर्‍हे, मांडवी, खानापूर, खामगाव मावळ आदी गावांत कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात आहेत. या तुलनेत तालुक्याच्या पूर्वभागातील लोणी काळभोर, थेऊर, फुरसुंगी आदी गावांत कुणबी नोंदीची संख्या कमी आहे.

शिवकालीन दस्त तसेच बि—टिश काळातील दस्तावेज जीर्ण झाले आहेत. त्यामुळे ते हाताळताना खबरदारी घ्यावी लागत आहे. कर्मचार्‍यांसह मोडी वाचकांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे दररोज पाच ते सहा गावांचे दस्तांची तपासणी पूर्ण होत आहे. आठवडाभरात सर्व गावांची जन्म-मृत्यू रजिस्टरची तपासणी पूर्ण होईल.

-चंद्रशेखर मते,

हेही वाचा

SCROLL FOR NEXT