Crime News : कंपनीला गंडा घालणार्‍या एजंटच्या साथीदारांना बेड्या | पुढारी

Crime News : कंपनीला गंडा घालणार्‍या एजंटच्या साथीदारांना बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध करून देणार्‍या येरवड्यातील इझी पे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला त्यांच्याकडेच काम करणार्‍या तब्बल 65 एजंटांनी संगनमताने तांत्रिक सुविधांचा गैरवापर करून साडेतीन कोटींचा आर्थिक गंडा घातल्याला प्रकार समोर आला होता. याप्रकरणी सायबर पोलिसांनी यातील दोन आरोपींना आता पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून अटक केली. या गुन्ह्यात यापूर्वीदेखील दोघांना अटक करण्यात आलेली आहे.

उबेद उर्फ उब्बेदुल्ला अन्सारी (36, रा. गया, बिहार), आयुब बाशिर आलम (20, रा. गया, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघेही बिहार येथील रहिवासी असून, ते पश्चिम बंगालमध्ये वास्तव्यास होते. तर, यापूर्वी या गुन्ह्यात अंकितकुमार अशोक पांडे (वय 20, रा. नवादा, बिहार), छोटू उर्फ एजाज आलम यांना अटक करण्यात आलेली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, इझी पे या कंपनीचे येरवड्यात कार्यालय आहे. ही कंपनी देशभरात ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देते. त्यासाठी कंपनीने नोंदणीकृत एजंटांची नेमणूक केली आहे.

11 ऑगस्ट 2022 पासून कंपनीच्या 65 एजंटांनी कंपनीच्या वेब पार्टल अ‍ॅपद्वारे अधिकृत यंत्रणेत कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अधिकृत दिलेले मोबाईल सोडून इतर मोबाईलचा वापर केला. त्याद्वारे कंपनीच्या व्हीपीए खात्यातून इतर 44 बँक खात्यावर एजंटचे कमिशन सोडून 3 कोटी 52 लाख 70 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. कंपनीच्या खात्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे गेल्यामुळे त्याची माहिती घेतली असता, एजंट लोकांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानुसार कंपनी व्यवस्थापनाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

गुन्ह्याचा तपास करत असताना, तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित आरोपी एजंट पांडे याला पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून पोलिस इतर आरोपींच्या मागावर होते. या दरम्यान संशयित आरोपी हे पश्चिम बंगाल येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक तुषार भोसले यांचे पथक पश्चिम बंगालला रवाना झाले. पथकाने अन्सारी आणि आलम यांना अटक केली. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, उपनिरीक्षक तुषार भोसले, अंमलदार नवनाथ जाधव, निलेश लांडगे, संदेश कर्णे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा

Back to top button