पुणे : पुढारी वृत्तसेवा : तंत्रज्ञानाचा वापर करत महागड्या कारच्या स्मार्ट की डेटा चोरी करून गाड्या चोरणार्या चौघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 20 लाख 80 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजेश राधेशाम पंडित (वय -37, रा. धयतुरागाव, जि. आग्रा, उत्तर प्रदेश), मनोज महेंद्र परिहार (ठाकूर) (वय 42, रा. नगाला अहिरगाव, जि. हाथरस, उत्तर प्रदेश), इस्माईल शब्बीर अहमद खान (वय 41, रा. शास्त्रीनगर, इस्ट दिल्ली ), गोरखनाथ ऊर्फ पप्पू साळवे (वय 41, काळेवाडी, पुणे ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिस ठाण्यात 19 लाख रुपयांची फॉर्च्युनर कार चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. मात्र, स्मार्ट लॉक सिस्टीम असणारी कार कशी चोरी झाली हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पोलिस अंमलदार अमोल सरतापे, संदीप येळे यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे धुंडाळून काढत तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढला. आरोपींना लोणी काळभोर येथूल कुंजीरवाडी फाटा येथून अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेली कार व इतर साहित्य असा एकूण 20 लाख 80 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्यावरील लोणीकंद व नाशिक येथील गंगापूर पोलिस ठाण्यातील दोन गाडी चोरीचे गुन्हे या तपासात उघड झाले.
आरोपींनी 10 दिवसांपूर्वी नाशिक येथून एक टोयोटा कार चोरून राजस्थान येथे दिल्याचेही तपासात कबूल केले. मात्र, या चोरीमुळे कंपनी लॉक सिस्टीम तयार करत आहेत त्यांनाही या चोरांनी छेद दिल्याचे समोर आले आहे. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड आणि त्यांच्या
पथकाने केली
अशी करत होते गाड्यांची चोरी..
फॉर्च्युनरसारख्या महागड्या कार कंपनी स्मार्ट चावी ग्राहकांना देत आहेत. ज्यामुळे ओरिजनल चावीशिवाय कार चालू होत नाही. यावर चोरांनी नामी शक्कल लावली. यातील पंडित, परिहार व खान यांना दिल्ली व नोयडा परिसरातील अशा महागड्या कार चोरी करण्याचा अनुभव होता. त्यांनी पुण्यातही अशा गाड्या हेरायला सुरुवात केली. ते परिसरात फिरून आधी अशा गाड्यांची रेकी करत, स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने गाडीची काच फोडून ते त्यांच्याकडील 100 एक्स टुल डुप्लिकेट चावी बनविण्याचे एक्सपॅड मशीन गाडीतील वायरींगला जोडत, यामुळे गाडीचा सॉफ्ट डाटा ट्रान्सफर करून घेता येई. प्रोग्राम कॉपी झाला की ते तो डाटा मशीनला ओबीडी 16 कॉड जोडून ट्रान्स्फर करून घेत. यामुळे डुप्लिकेट चावीमध्ये गाडीचा सर्व सॉफ्ट डाटा आला की या चावीच्या साहाय्याने ते गाडी आरामत चोरी करत होते. त्यानंतर ती गाडी डुप्लीकेट नंबर लावून स्मार्ट कार्ड तयार करत या गाड्या गुजरात येथे गहान स्वरूपात ठेवल्या जात, अशी कबुली आरोपींनी पोलिस तपासात दिली आहे. या चोरीच्या हायटेक पद्धतीने पोलिस काही काळ चक्रावून गेले होते.
हेही वाचा :