पुणे : यंदा घाटमाथ्यावर मे महिन्यापासून अतिवृष्टी सुरू आहे. यंदा जूनमध्येही अवघ्या 26 दिवसांत 1000 ते 2300 मि.मी. पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी अल निनो सक्रिय असूनही ताम्हिणीत जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात 10 हजार मिलिमीटर पाऊस झाला होता, तर महाबळेश्वरमध्ये सात हजार मि.मी.ची नोंद झाली होती. यंदा हवेचे दाब अनुकूल असल्याने ताम्हिणी आणि महाबळेश्वर ही महाराष्ट्रातील अतिवृष्टीची ठिकाणे मेघालयातील मौसेराम आणि चेरापुंजीमधील अतिवृष्टीचे विक्रम मागे टाकतील,असा विश्वास हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
देशात सर्वाधिक पाऊस हा मेघालयातील चेरापुंजी आणि मौसेराममध्येच पडतो, हे नागरिकांना माहित आहे. मात्र, महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही तेवढाच पाऊस दरवर्षी जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात पडतो. याकडे सर्वांचे दुर्लक्ष आजवर झाले होते. मात्र, आयएमडी पुणे येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, डॉ. डी. आर. कोठावळे, डॉ. एन. आर. देशपांडे आणि डॉ. एस. जी. नरखेडकर यांनी खास महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवरील पर्जन्यमानाचा अभ्यास केला आहे.
शास्त्रज्ज्ञांनी सखोल अभ्यास करुन एक शोधनिबंध जगात प्रथमच महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर सादर केला. यात त्यांनी महाराष्ट्रातील घाटमाथा हा देशात सर्वाधिक पावसाचा असल्याचा दावा केला आहे. काहीवेळा येथील पाऊस मेघालयातील मौसेराम आणि चेरापुंजी यांनाही मागे टाकतो. शास्त्रज्ञांनी त्याचा दहा वर्षांतील नोंदीसह तौलनिक अभ्यासही त्यात मांडला. त्यामुळे जगाला घाटमाथ्यावरच्या पावसाची नवीन माहिती मिळाली. यात ताम्हिणी आणि महाबळेश्वर ही ठिकाणे सर्वाधिक पावसाची असल्याचे मत या शास्त्रज्ञांनी पटवून दिले.
मागच्या वर्षी 2024 च्या मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत मेघालयातील मौसेराम येथे 11000 मि. मी. पाऊस झाला होता, तर ताम्हिणी घाटात 10 हजार 700 मि. मी. पावसाची नोंद झाली होती. तर महाबळेश्वरमध्ये सात हजार मि. मी. पाऊस झाला होता. सर्वाधिक पाऊस हा जुलै आणि ऑगस्टमध्ये झाला होता. मागच्या वर्षीच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव होता. तरीही ताम्हिणी घाट पर्यन्यमानात दुसर्या क्रमांकावर होता.
यंदा घाटमाथ्यावर मेपासूनच धो-धो पावसाला सुरुवात झाली आहे. मे महिन्यात 300 ते 400 टक्के पाऊस अधिक झाला आहे, तर जूनमध्ये घाटमाथ्याने 26 जूनअखेर 1000 ते 2300 मि.मी.चा टप्पा पार केला आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेर तो नक्कीच 11 ते 12 हजार मि.मी. पार जाईल, असा विश्वास हवामान शास्त्रज्ञांना आहे.
भाग पाऊस
ताम्हिणी - 2305
महाबळेश्वर - 2000
शिरगाव - 2213
अंबोणे - 1648
दावडी -1854
डोंगरवाडी - 1639
भिरा -1248
खोपोली - 1120
लोणावळा - 1175
पोफळी - 1066
मुळशी - 1285
वळवण - 1045
कोयना - 1192