Heavy rainfall in Marathwada after 20 years
आशिष देशमुख
पुणे: मराठवाड्यात यंदा 20 वर्षांनंतर मोठा पूर पाहावयास मिळाला. त्याचा अंदाज हवामान विभागाने 15 मे रोजीच वर्तवला होता. सर्वप्रथम हे वृत्त दै. ‘पुढारी’ने 16 मे रोजी प्रसिद्ध केले होते. यंदा मराठवाड्यात 18 आणि 28 ऑगस्ट असे दोन दिवस सलग दहा दिवसांच्या अंतराने अतिवृष्टी झाली. बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांना पुराच्या पाण्याने झोडपले. जायकवाडी धरण दोनदा भरल्याने 18 दरवाजे उघडावे लागले. अशी परिस्थिती 2005 आणि 2006 नंतर 20 वर्षांनी मराठवाड्याने प्रथमच अनुभवली.
मराठवाड्यात राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत सरासरी पर्जन्यमान हे 425 मिलिमीटरच्या जवळपास आहे. मान्सून हंगामात 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत या भागात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तुलनेत तसा कमीच पाऊस पडतो. (Latest Pune News)
त्यामुळे मराठवाड्यात पूरस्थिती फार कमी वेळा पाहावयास मिळते. यंदा मराठवाड्यात मे महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यानंतर जून आणि जुलैमध्ये कमी पाऊस झाला. पिके वाळून चालली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत तिथे पाऊस नव्हता.
मात्र, 15 ऑगस्टनंतर पावसाला सुरुवात झाली. मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाने थैमान घातले. 15 ते 18 ऑगस्ट या चार दिवसांत नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार केला. जालना, बीड, लातूर जिल्ह्यांतही 200 ते 300 टक्के पाऊस झाला. संपूर्ण मराठवाड्यात सरासरी 330 मिलिमीटर पाऊस झाला.
18 ऑगस्ट रोजी नांदेडला पूरस्थितीने वेढले. त्यानंतर पाऊस ओसरला. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टी झाली. यावेळी लातूरमध्ये 1627 टक्के जास्त पाऊस झाला.
बीड आणि नांदेडला पुन्हा पावसाने झोडपले. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. मात्र, या तीन जिल्ह्यांत पुराने हाहाकार निर्माण केला. ऐन गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच मराठवाड्याला पुराने वेढल्याने शेतकर्यांची पिके पाण्यात गेली. शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात मोठी जीवित हानीदेखील झाली.
महाराष्ट्राची सरासरी दोन पावसांनी केली पार
यंदा जून आणि जुलैमध्ये कोकणातही कमी पाऊस होता; तर मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस होता. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात खूप कमी पाऊस होता. विदर्भातही सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाला. सर्वात कमी पाऊस मराठवाड्यात झाला. जून आणि जुलैमध्ये मराठवाड्यात तब्बल 40 टक्के इतकी तूट होती.
ती तूट एका दिवसाच्या पावसाने भरून काढली. 18 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाने मराठवाड्याची 40 टक्के तुटीवरून अधिक दोन टक्के इतकी टक्केवारी झाली. त्यामुळे मराठवाड्यातील पाऊस 411 मिलिमीटरवर पोहोचला. त्यानंतर थोडी उघडीप मिळत नाही तोच बंगालच्या उपसागरात झालेल्या स्थितीमुळे पुन्हा मराठवाड्यात पुराने थैमान घातले आणि 28 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. या पावसानेदेखील मराठवाडा अधिक सहा टक्क्यांपर्यंत पोहोचला.
हवामान विभागाने 15 मे रोजी वर्तवला होता अंदाज
भारतीय हवामान विभागाने यंदा मे महिन्यात विभागवार पावसाच्या अंदाजाची टक्केवारी प्रथमच घोषित केली होती. 15 मे रोजी मान्सूनचा पहिला अंदाज दिल्ली मुख्यालयाने जाहीर केला. यात त्यांनी ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. मात्र, यात तारखांचे भाकीत नव्हते. राज्यात मराठवाड्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने सर्वप्रथम 16 मे रोजी प्रसिद्ध केले होते.