

पुणे: राज्यात मंगळवारीच मान्सून सक्रिय झाला असून, पुन्हा संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस सुरू होण्याचे संकेत आहेत. 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा; तर विदर्भ, मराठवाड्याला मुसळधारेचा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात सध्या चक्रवाताची स्थिती सक्रिय आहे. पुढील 24 तासांत वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. (Latest Pune News)
त्यामुळे, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा किनारपट्टीसह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात वाढलेला पावसाचा जोर सप्टेंबरच्या सुरुवातीलाही कायम राहणार आहे. हवामान विभागाने सप्टेंबरमध्ये देशात दीर्घकालीन सरासरीच्या 109 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविला आहे.