खेड तालुक्यात पावसाचा कहर; उन्हाळी हंगाम फसला, खरीपही धोक्यात Pudhari
पुणे

Khed News: खेड तालुक्यात पावसाचा कहर; उन्हाळी हंगाम फसला, खरीपही धोक्यात

वाया गेली वर्षभराची मेहनत; शेतकर्‍यांचा सरकारकडे आक्रोश

पुढारी वृत्तसेवा

खेड: गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे खेड तालुक्यातील शेतकर्‍यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. उन्हाळी बाजरीचे पीक जमीनदोस्त झाले असून, काढणी करून शेतात साठवलेली कणसे पावसात भिजून खराब झाली आहेत.

भुईमूग पिके पिवळी पडली असून, शेंगांना चवर लागल्यामुळे नुकसान अधिक वाढले आहे. मका, भाजीपाला व इतर तरकारी पिकांमध्येही पाणी साचल्याने हातातोंडाशी आलेले उत्पन्न धोक्यात आले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले असून, तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (Latest Pune News)

मान्सूनपूर्व पावसामुळे उभ्या पिकांमध्ये पाणी साचल्याने उन्हाळी हंगाम पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. खरीप हंगामाच्या नियोजनाची सुरुवात होण्याआधीच पावसाने अडथळा निर्माण केला असून, शेतात साचलेल्या पाण्यामुळे पेरणीपूर्व मशागत, खतफोडणी यांसारखी कामेही ठप्प झाली आहेत.

शेतकर्‍यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. ‘आम्ही वर्षभर मेहनत करतो, पण अशा अवकाळी पावसामुळे सगळं वाया जातंय. सरकारने तातडीने मदत करावी,’ अशी मागणी तिन्हेवाडीचे उपसरपंच रंगनाथ आरूडे, तुकाईवाडीचे माजी सरपंच देवराम थिगळे आणि सरपंच विजय थिगळे यांनी केली.

इतर अनेक शेतकर्‍यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. खेड तालुक्यातील शेतकर्‍यांचे मान्सूनपूर्व पावसामुळे कंबरडे मोडले असून, आता प्रशासन आणि सरकारकडून होणार्‍या तातडीच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आषाढ-श्रावण सुरू झाल्याचा भास

खेड तालुक्यात चासकमान, भामा आसखेड आणि कळमोडी अशी महत्त्वाची धरणे असून, उन्हाळ्यात कालवे व नदीपात्रांत भरपूर पाणीसाठा असतो. त्यामुळे शेतकरी उन्हाळी पिकांकडे अधिक झुकतात. या पिकांवर उन्हाळी वातावरणात नुकसान होण्याची शक्यता कमी असते. शेतकरी बाजरी, भुईमूग, मका, भाजीपाला व इतर तरकारी पिके घेऊन वर्षभरासाठी धान्य व जनावरांचा चारा तयार करतात, तसेच भाजीपाला विक्रीतून कुटुंबाचा आर्थिक गाडा चालवतात.

मात्र, यंदा वेळेआधीच पावसाचा जोर वाढल्याने आषाढ-श्रावण महिना सुरू झाल्यासारखा भास निर्माण झाला आहे. त्यामुळे काढणीला आलेले उन्हाळी पीक वाया जात असतानाच खरीप हंगामही संकटात सापडल्याचे स्पष्ट दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT