पुणे: देशातील सफरचंद उत्पादक क्षेत्र असलेल्या काश्मीर तसेच हिमाचल प्रदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते वाहून जाण्यासह बहुतांश ठिकाणी मातीचे ढिगारे रस्त्यावर आले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे येथील वाहतूक ठप्प झाल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातून देशी सफरचंद गायब झाल्याचे चित्र आहे.
बाजारात परदेशी सफरचंद उपलब्ध आहेत. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने सफरचंदाच्या भावात मागील आठवडाभरात किलोमागे 50 ते 100 रुपयांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. (Latest Pune News)
आरोग्यासाठी अधिक गुणकारी समजली जाणारी अन् देशासह परदेशातून शहरातील बाजारातपेठेत दाखल होणारी सफरचंदे लहानांपासून ज्येष्ठांच्या आवडीचे फळ. सफरचंदाचे गुणधर्म आणि त्याच्या मागणीचा विचार करता बाजारात वर्षभर सफरचंद पाहायला मिळतात.
पावसाळा हा भारतीय सफरचंदाचा
मुख्य हंगाम असतो. मात्र, यंदा काश्मीर व हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे या भागातील काही ठिकाणी रस्ते वाहून गेले तर काही ठिकाणी मातीचे ढिगारे रस्त्यावर आले. त्यामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाल्याने मागील दहा दिवसांपासून गाड्या रस्त्यावरच उभ्या आहेत. केंद्र तसेच राज्य सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, ते अपुरे पडत असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठांतील आवकेवर झाल्याचे सांगण्यात आले.
काश्मीरचा सफरचंदाचा हंगाम नुकताच सुरू झाला होता. बाजारात दररोज आठ ते दहा हजार पेटी आवक होत होती. मात्र, ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे मागील पंधरा दिवसांपासून रस्ते बंद आहेत. सरकारकडून रेल्वेतून माल वाहतूक करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, त्यामध्ये मालाची हाताळणी जास्त होत असल्याने त्याचा
दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत छोट्या पिकअपने श्रीनगरहून जम्मूला माल आणण्यात येत आहे. तेथून तो गाडीत भरून तो बाजारपेठेत पाठविण्यात आला आहे. त्यामुळे, उशिराने सफरचंद बाजारात दाखल होणार आहे.- सत्यजित झेंडे, सफरचंदाचे व्यापारी, मार्केट यार्ड.