Wildlife Water Crisis Pudhari
पुणे

Wildlife Water Crisis: कडक उन्हाळा... पशू-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात!

चारा, पाण्यासाठी वणवण; शासनाने विशेष योजना राबविण्याची पक्षिमित्रांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वाघोली: उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, भीषण पाणीटंचाईचा फटका आता माणसांसोबतच पक्षी, प्राणी आणि जलचरांनाही बसू लागला आहे. ओढे, नद्या आणि नाले कोरडे पडल्याने पाण्यासाठी पक्षी व प्राण्यांची वणवण सुरू असून, त्यांच्या अस्तित्वावरच संकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पाण्याअभावी पक्षी आणि प्राण्यांचा मृत्यू होत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.

वाघोलीसह ग््राामीण भागातील लहान-मोठे जलस्रोत आटल्याने कासवांसारख्या जलचर प्राण्यांनाही अन्नाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे हे प्राणी रात्रीच्या वेळी अन्न आणि पाण्याच्या शोधात बाहेर पडत असून, अशा वेळी तस्करी करणाऱ्या टोळ्यांकडून त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कडाक्याच्या उन्हामुळे पक्ष्यांसह ससे, कोल्हे, लांडगे यांसारखे वन्यप्राणी पाण्यासाठी भटकताना दिसत आहेत. अनेकदा हे प्राणी विहिरीत पडल्याच्या घटनाही समोर येत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात वन्यजीव आणि पक्ष्यांच्या संरक्षणासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

विशेषतः पक्ष्यांसाठी शासनामार्फत मोफत घरटी, पाणवठे आणि अन्नपुरवठा उपलब्ध करून दिल्यास स्वयंसेवी संस्था, प्राणिमित्र आणि नागरिक मोठ्या प्रमाणात पुढे येतील. पाणी आणि अन्नाअभावी अनेक पक्षी व प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची खंतही पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.

उन्हाळ्यात पशू-पक्ष्यांसाठी हे करा

नागरिक, सेवाभावी संस्था आणि पक्षिमित्रांनी पुढाकार घेत पक्षी व प्राण्यांसाठी पाण्याची भांडी ठेवणे, अन्नपुरवठा करणे यांसारखे उपक्रम राबविल्यास मोठ्या प्रमाणात जीव वाचू शकतात, असे मत पक्षिप्रेमी, प्राणिप्रेमींनी व्यक्त केले आहे. तसेच, शासनाने वाढत्या उष्णतेची दाहकता लक्षात घेऊन पक्षी आणि प्राण्यांसाठी विशेष योजना हाती घ्याव्यात, अशी मागणी प्राणिमित्रांकडून होत आहे.

उन्हाळ्याची तीवता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी पक्षी आणि वन्यप्राणी मोठ्या संकटात सापडले आहेत. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर किंवा परिसरात पाण्याची छोटी भांडी ठेवली, तरी अनेक निष्पाप जिवांचे प्राण वाचू शकतात. शासनानेही पक्ष्यांसाठी घरटी, पाणवठे आणि अन्नपुरवठ्याच्या विशेष योजना राबविण्याची गरज आहे.
- महावीर कद्रे, प्राणिमित्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT