पुणे: महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी (दि.11) सात खासगी रुग्णालयांना त्रुटींबाबत नोटीस पाठवली आहे. यामध्ये औंध क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील चार, कसबा पेठेतील एक, घोले रस्ता येथील एक आणि कोथरूड येथील एक अशा सात रुग्णालयांचा समावेश आहे. मागील आठवड्यात चार रुग्णालयांना नोटीस पाठवण्यात आली होती.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी सहा महिन्यांच्या टप्प्याने दोनदा खासगी रुग्णालयांची तपासणी केली जाते. यामध्ये दरपत्रक, रुग्णहक्क संहिता, टोल फ्री क्रमांक अशा विविध निकषांवर तपासणी केली जाते. सोमवारी नोटीस देण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये दरपत्रक आणि रुग्ण हक्क संहिता दर्शनी भागात न लावणे, टोल फ्री क्रमांक न लिहिणे, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसणे अशा त्रुटी आढळून आल्या आहेत. (Latest Pune News)
महाराष्ट्र सुश्रुषा गृहनोंदणी कायद्यानुसार बंधनकारक नियमांचे पालन न करणार्या रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. कायद्यानुसार रुग्णालयाच्या दर्शनी भागात प्रशासनाने रुग्ण हक्क संहिता, रुग्णालयाचे दर पत्रक, टोल फ्री क्रमांक, नमुना ड (रुग्णाचा तपशील), अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र आदी लावणे बंधनकारक आहे.
या कायद्यानुसार रुग्णालयांकडून नियमांचे पालन केले जाते की नाही याची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत रुग्णालयांना त्रुटी दूर करण्यासंदर्भात नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना तीस दिवसांची मुदत दिली आहे.
महापालिकेकडून वर्षातून दोन वेळा खासगी रुग्णालयांची तपासणी केली जाते. शहरात लहान-मोठी अशी सुमारे 850 रुग्णालये आणि दवाखाने आहेत. मागील आठवड्यात चार आणि या आठवड्यात सात रुग्णालयांना नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीस दिल्यानंतरही त्रुटींची पूर्तता न करणार्या रुग्णालयाच्या प्रशासनावर बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार कारवाई केली जाते.- डॉ. सूर्यकांत देवकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका