

पुणे: खराडीत गणपती मंडळांची मीटिंग संपल्यानंतर घरी चाललेल्या तरुणाला भरधाव हायवाने दिलेल्या धडकेत त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना नगर रोडवरील दर्गा चौकाच्या बाजूला घडली. त्यामुळे त्या तरुणासाठी ही गणशोत्सवाची मीटिंग अखेरची ठरली.
योगेश सत्यवान चौधरी (रा. गणपती मंदिरामागे, खराडी गाव) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांचे चुलत भाऊ दौलत राजाराम चौधरी (वय 32, रा. गणपी मंदिरामागे, खराडी गाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हायवाचालक परमेश्वर काशिनाथ पवार (रा. कोल्हेवाडी, खडकवासला) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दौलत चौधरी हे खराडीत राहण्यास आहेत. तेथेच दुसर्या मजल्यावर त्यांचे चुलत बंधू योगेश चौधरी राहत होते. दि. 10 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गणपती मंडळाची मीटिंग होती. त्यामुळे दौलत आणि त्याचे इतर सहकारी मित्र खराडी येथील चौधरीवस्ती येथे गेले होते. त्या मीटिंगला त्यांचे बंधू योगेश चौधरी उपस्थित होते.
ही मीटिंग संपल्यानंतर योगेश बाहेर पडले. त्यानंतर 12 वाजता दौलत यांनी योगेश यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल केला. परंतु, त्यांनी कॉल उचलला नाही. त्यानंतर दौलत त्यांच्या घराजवळ पोहचले असता त्यांच्या मोबाईलवर मित्राचा कॉल आला. त्याने दौलत यांना योगेश यांचा अपघात झाल्याचे कळविले.
त्यानंतर लागलीच दौलत त्यांच्या मित्रांसोबत अपघाताच्या ठिकाणी गेले. त्या वेळी योगेश हे रस्त्यावर पडले होते तसेच त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. रस्त्याच्या कडेला हायवा गाडी उभी होती. मात्र, हायवावरील चालक हा योगेश यांना धडक देऊन पळून गेला होता. दरम्यान उपचारांपूर्वीच योगेश यांचा मृत्यू झाला.