पुणे

पुणे : मैत्रिणीला खूश करण्यासाठी घरफोड्या

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मैत्रिणीला खूश करण्यासाठी घरफोड्या करणार्‍या हरियाणा येथील चोरट्याला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. तो दिवसा हॉटेलमध्ये शेफचे काम करत होता, तर रात्री बंद असलेल्या ऑफिसेसवर डल्ला मारत होता. फुरकान नईम खान (वय 21, रा. पानिपत, हरियाणा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चार गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी चोरी केलेले भारतीय व परकीय चलन जप्त केले आहे. खराडी येथील सिनॅप्स लॅब्स प्रा. लिमिटेड कंपनीच्या ऑफिसमध्ये सात ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. चोरट्याने तेथून तीन लाख सात हजार 492 रुपयांचे भारतीय व परकीय चलनाची चोरी केली होती.

हा प्रकार समोर आल्यानंतर पवन चव्हाण (वय 30) यांनी याबाबत चंदननगर पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना, तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारामार्फत सुभाष आव्हाड आणि विकास कदम यांना खान याच्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यानेच ही घरफोडी केली असून, सध्या तो पिंपरी-चिंचवड येथे असल्याचे समजले. त्याला पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच इतर चार ठिकाणी अशाचप्रकारे चोरी केल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पालवे, अरविंद कुमरे कर्मचारी सचिन कुटे, अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर, विकास कदम यांच्या पथकाने केली.

बंद कार्यालये फोडण्यात पटाईत
खान हा शहरातील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता, तर रात्रीच्यावेळी तो घरफोड्या करत होता. बंद असलेली ऑफिसेस शोधून डल्ला मारण्यात तो पटाईत आहे. इमारतीवर तो पाईपच्या साह्याने चढत होता. त्यानंतर तो बाथरुमच्या खिडकीच्या काचा काढून आत प्रवेश करत होता. तो चोरी केलेले पैसे आपल्या मैत्रिणीला खूश करण्यासाठी उडवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT