लोणी काळभोर: पूर्व हवेली तालुक्यामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा पहिला टप्पा राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अपर तहसील कार्यालय, लोणी काळभोर यांच्या कार्यक्षेत्रातील वाघोली, अष्टापूर, उरुळी कांचन व थेऊर मंडळांमध्ये टप्प्याटप्प्याने समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने व अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिली.
ग््राामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न तातडीने सोडविणे, प्रलंबित तक्रारी निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. मंडल अधिकारी स्तरावरील शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : शनिवार, दि. 7 मार्च - वाघोली (केसनंद), शनिवार, दि. 14 मार्च - अष्टापूर, शुक्रवार, दि. 10 एप्रिल - उरुळी कांचन (सोरतापवाडी), शुक्रवार, दि. 17 एप्रिल - थेऊर (कोलवडी).
या शिबिरांत भोगवटा वर्ग 2 जमिनींचे भोगवटावर्ग 1 मध्ये रूपांतर करून दुरुस्त 7/12 उतारे वाटप, तुकडेबंदी कायद्याविरोधातील व्यवहारांची तपासणी, भूसंपादन व अकृषिक प्रकरणांतील दप्तर अद्ययावत करणे, ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत प्रलंबित लाभार्थ्यांची नोंद, ‘जिवंत 7/12’ मोहिमेअंतर्गत नोंदी निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्कमार्फत 7/12 वरील चुका दुरुस्त करणे, तसेच विविध फेरफार नोंदींचे वितरण अशा सेवा दिल्या जाणार आहेत.
याशिवाय, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना मंजुरी आदेश, शालेय दाखले वितरण, पाणंद रस्त्यांबाबत प्रशासकीय मान्यता, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत प्रमाणपत्रे, अकृषिक तरतुदींवरील मार्गदर्शन, तसेच ॲग््राीस्टॅक, पीएम किसान व ई-केवायसीसंदर्भातील कामकाजही शिबिरात पार पडणार आहे.
एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवांचा लाभ मिळावा, या उद्देशाने आयोजित या अभियानात लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, युवक मंडळे व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ही शिबिरे नागरिकांसाठी मोठी संधी ठरणार असल्याचे सांगण्यात आले.