कडूस : पुढारी वृत्तसेवा
जगोध्दाराधर्मा चरित करण्यासाधु तुकया..!
वसे देहूगावी निकट शरण जाऊनि तया..!!
करी सेवा भावे गुरुमुख अभंगासी लिखित..!
नमो गंगारामा पदी गुरु तुकाराम सहिता..!!
खेड तालुक्यातील प्रतिपंढरपूर ओळखल्या जाणाऱ्या कडूस येथील श्री पांडूरंग मंदिरात संत तुकाराम महाराजांचे १४ वे टाळकरी गंगाजी बुवा मवाळांच्या हस्तलिखीत ग्रंथ आजही उपलब्ध आहे. या गाथेत संत तुकाराम महाराजांनी गायलेले अभंग रचना बोरुच्या सहाय्याने लिहण्यात आल्या आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी संतशिरोमणी गंगाजी बुवा मवाळ मुकुटमणी होते. गंगाजी बुवा मवाळ यांच्या वास्तव्याने आणि संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाने कडूस गावत दैवी पावित्र्य लाभले आहे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनावेळी गंगाजी बुवा मवाळ मागे उभे राहून साथ करीत असत.
श्री संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या गाथेची अस्सल प्रत कडूस येथे असून, तुकाराम महाराजांचे एक प्रमुख शिष्य साधू श्री गंगाजी बुवा मवाळांच्या हस्तलिखित अभंग गाथा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेमधील काही ओव्या ज्या इतरत्र मिळू शकल्या नाहीत, त्या कडूसच्या गाथेत उपलब्ध झाल्या आहेत. ही मोठी धर्म देणगी कडूस गावाला लाभली आहे. खुद्द तुकाराम महाराजांनी स्वतःजवळच्या प्रासादिक "पांडुरंग- राही- रुखुमाई मुर्ती गंगाजी पंताना दिल्या व सदगुरु केशव चैतन्य यांच्या पादुका देखील मुर्तीजवळ ठेवण्यासाठी
देऊन त्याचे पुजन मनोमावे करण्याचा उपदेश केला.
श्री तुकाराम महाराज यांच्या समकालात बांधले गेलेले हे मंदिर म्हणजे अवघ्या मराठी मुलखाचे सांस्कृतिक वैभव आहे. कडूस गावाला हा असामान्य दैवी वारसा लाभला आहे. कडूस गावाच्या श्री विठ्ठल मंदिराचा वार्षिक श्री उत्सव अगदी नियमितपणे चालू आहे. हे पाहून प्रत्येकाच्या मनाला फार मोठा आनंद होतो. या देवस्थानाची आचरणात, आस्था, व्यवस्था, आणि सौंदर्य वृद्धी आज अखंडितपणे उत्तम सांभाळली जात आहे. हाती वीणा घेऊन वर्षानुवर्ष जणू जागर घालीत आहे.