पुणे

अनधिकृत बांधकामांवर हातोडा ; भारती विद्यापीठ परिसरात कारवाई

अमृता चौगुले

धनकवडी : पुढारी वृत्तसेवा :  भारती विद्यापीठ परिसरातील भारती विहार, पतंग प्लाझा सोसायटी व पीआयसीटी कॉलेजसमोरील रस्त्याच्या बाजूने असलेल्या भागात फ्रंट मार्जिन व साईड मार्जिन जागेवर अनेक दुकानदारांनी तात्पुरत्या स्वरूपात उभ्या केलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. पत्र्याच्या शेड, बोर्ड व अनधिकृत विक्री स्टॉल या वेळी हटवण्यात आले. महापालिकेच्या बांधकाम विभाग झोन 5, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभाग यांच्याकडून संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली.

कार्यकारी अभियंता रमेश काकडे, उप अभियंता शैलेंद्र काथवटे, शाखा अभियंता वंदना गवारी, कनिष्ठ अभियंता पीयूष विघे,किशन चव्हाण, शीतल खोपडे, अतिक्रमण निरीक्षक यांनी 2 जेसीबी, 10 कर्मचारी व पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
हॉटेल्स व दुकाने यांच्यासमोर अनेक ग्राहकांकडून रस्त्यापर्यंत वाहने लावली जात होती. परिणामी, वाहतूक कोंडी होत होती. परिसराच्या सोसायटीतील नागरिकांनी हॉटेल व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे कारवाई करण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

रहिवाशांच्या तक्रारी
या परिसरामध्ये सकाळ-संध्याकाळ वर्दळ असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व इतरांना या अतिक्रमणाचा त्रास सहन करावा लागतो. तसेच या परिसरातील सोसायट्यांमधील स्थानिक रहिवाशांना या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती उप अभियंता शैलेंद्र काथवटे यांनी दिली.

भारती विद्यापीठ गेटच्या मागील बाजूस असलेली अनधिकृत हॉटेल व दुकानांसमोरील जागेत अनधिकृत लावण्यात आलेले स्टॉल आणि टेबल यामुळे गर्दी होत आहे. त्यामुळे वाहनांचे पार्किंग रस्त्याच्या मध्यापर्यंत होत आहे. तसेच त्रिमूर्ती चौक परिसरातही अनधिकृत पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. अनधिकृत स्टॉलधारक, दुकानदारांनी सहकार्य न केल्यास यापुढेही अतिक्रमण कारवाई करण्यात येईल.
       सुरेखा भणगे, सहायक आयुक्त, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT