पुणे

गारपीट, वार्‍याचा मतदानाला फटका; आणे-माळशे मतदारांची पांगापांग

Laxman Dhenge

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघातील आणे-माळशेज पट्ट्यातील गावांमध्ये सोमवारी (दि. 13) दुपारी 4 च्या सुमारास अचानक पावसाला जोरदार सुरुवात होऊन मतदारांची पांगापांग झाली. यामुळे मतदान प्रक्रियेत विस्कळीतपणा आला. मतदानासाठी आलेल्या वयोवृद्ध मतदारांचे हाल झाले. ओतूर आणि परिसरात सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. सायंकाळी त्याचे प्रमाण थोडे कमी झाले असले, तरी पावसात मतदारांना मतदान केंद्रांवर सुविधा निर्माण करताना व मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांची चांगलीच त्रेधा उडाली. पावसामुळे काही काळ मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळाला. पाऊस, गारपीट आणि वादळी वार्‍याचा मतदानाला फटका बसला.

सोमवारी सकाळपासूनच नागरिकांना उकाड्याने हैराण केले होते. त्याचे रूपांतर दुपारी पावसात होऊन पूर्ण क्षमतेने रस्त्यांवरून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते. मढ, पिंपळगाव जोगा, डिंगोरे, उदापूर, मांदारने, ओतूर या गावांच्या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. डिंगोरे परिसरात सुमारे तासभर जोराच्या वार्‍यासह मोठ्या गारांचा पाऊस कोसळल्याचे डिंगोरेचे माजी सरपंच राजेंद्र उकिरडे यांनी सांगितले.

मात्र, या अवकाळी पावसामुळे कुठेही नुकसान झाले असल्याचे वृत्त नाही. मतदान केंद्रावर ऐन मतदानाच्या गर्दीच्या वेळी जोराचा पाऊस सुरू झाल्याने मतदानावर त्याचा परिणाम होण्याची व टक्केवारी घसरण्याची कुजबुज मतदारांमध्ये ऐकायला मिळाली. तरीही या संपूर्ण परिसरात 52 ते 55 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान, ओतूर व आजूबाजूच्या परिसरात प्रत्येक निवडणुकीत या भागात सुमारे 65 ते 70 टक्के मतदानहोतच असते. आजच्या मतदानात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरल्याची ही पहिलीच वेळ आहे, अशीदेखील चर्चा मतदारांमध्ये आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT