Mahavitaran Bribery Case Pudhari
पुणे

Mahavitaran Bribery Case: वीजमीटरसाठी लाच मागणे भोवले; अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला सात हजारांची लाच घेताना अटक

आरोपीने 12 नवीन मीटरच्या कामासाठी प्रत्येकी हजार प्रमाणे 12 हजारांची लाच मागितल्याचे समोर आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नवीन वीजमीटर जोडणीच्या कामासाठी कंत्राटदाराकडे लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या हडपसर उपविभागामधील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. आरोपीने 12 नवीन मीटरच्या कामासाठी प्रत्येकी हजार प्रमाणे 12 हजारांची लाच मागितल्याचे समोर आले आहे.

रामचंद्र नारायण लोंढे असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत 43 वर्षीय कंत्राटदाराने फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे महावितरणमध्ये इलेक्ट्रिकल सब-कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. त्यांनी नुकतेच 12 नवीन वीजमीटर जोडणीचे काम पूर्ण केले होते.

या कामाच्या मंजुरीसाठी आणि प्रक्रियेसाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र लोंढे याने प्रतिमीटर एक हजार रुपये याप्रमाणे एकूण 12 हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारदाराने एसीबीकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते.

तक्रारीनुसार, लोंढे याने केवळ 12 मीटरजोडणीच्या कामासाठीच नव्हे, तर तक्रारदाराला मिळालेल्या आणखी एका नवीन इमारतीच्या वीजजोडणीच्या कामासाठी 50 हजार रुपयांची मागणी केल्याचाही आरोप आहे.

या तक्रारीची दखल घेत एसीबीने 2 जून रोजी पडताळणी केली. पडताळणीदरम्यान लोंढेने 12 हजार रुपयांच्या लाचेपैकी 4 हजार 500 रुपये यापूर्वी स्वीकारल्याचे कबूल केले. उर्वरित 7,500 रुपयांची लाच स्वीकारताना लोंढे याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

त्यांच्या विरोधात फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT