Hadapsar Traffic Congestion Pudhari
पुणे

Hadapsar Traffic Congestion: हडपसरला वाहनांच्या लांबच लांब रांगा; वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, नागरिक त्रस्त

चार उड्डाणपूल उभारले, तरी समस्या कायम

पुढारी वृत्तसेवा

हडपसर: हडपसर परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असून, गुरुवारी सकाळी दहापासून मगरपट्टा चौक, गाडीतळ चौक, गांधी चौक, रामटेकडी उड्डाणपूल, मगरपट्टा उड्डाणपूल आणि हडपसर उड्डाणपूल परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनचालक, प्रवासी, नागरिक आणि विद्यार्थी तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

परिसरात अवघ्या तीन किलोमीटरच्या भागात चार उड्डाणपूल उभारण्यात आले असले, तरी प्रभावी वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप सुटला नाही. प्रमुख चौकांमध्ये ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, यासाठी विकास आराखड्यातील रखडलेले रस्ते हे प्रमुख कारण असल्याचे नागरिकांनी सांगितले.

१९८७ साली सादर झालेल्या आणि १९९८ मध्ये मंजूर झालेल्या विकास आराखड्यात ३०, २४, १८ आणि १२ मीटर रुंदीचे अनेक रस्ते प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, अनेक वर्षे उलटूनही हे रस्ते पूर्णत्वास आलेले नाहीत. त्यामुळे वाढत्या वाहनसंख्येचा ताण जुन्या रस्त्यांवर पडत असून, वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर होत आहे.

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते अशी महत्त्वाची पदे हडपसरच्या लोकप्रतिनिधींना मिळाली. मात्र, विकास आराखड्यातील रस्ते विकसित झाले नाहीत. त्यामुळे इतकी राजकीय ताकद मिळूनही हडपसरचा विकास का झाला नाही, असा प्रश्न नागरिक आता उपस्थित करत आहेत.

उड्डाणपुलांच्या खाली, सोलापूर रस्त्यावर आणि प्रमुख चौकांसह परिसरातील रस्त्यांवर अतिक्रमणे वाढल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाकडून मंत्री मार्केटसमोरील बेकायदेशीर कांदा-बटाटा विक्रीसह अन्य अतिक्रमणांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील : आ. तुपे

हडपसर विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मी विधानसभेत मांडला आहे. या भागासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. फातिमानगर ते यवतदरम्यानच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी सुमारे साडेसात हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद आहे. मेट्रोचेही काम लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरच परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.

हडपसर परिसरात चार उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. मात्र, नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होत नसेल, तर या पुलांचा उपयोग काय? ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलिस आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय साधून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- मनीषा राऊत, सोनल कोद्रे, रहिवासी, हडपसर
हडपसरमध्ये गेल्या २८ वर्षांत विकास आराखड्यातील (डीपी) एकही प्रमुख रस्ता पूर्णपणे विकसित करण्यात आला नाही. या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या नियोजनशून्य कारभारामुळे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
- मयूर फडतरे, रहिवासी, हडपसर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT