Hadapsar Traffic Congestion Pudhari
पुणे

Hadapsar Traffic Congestion: हडपसरमध्ये वाहतूक कोंडीचा विळखा; एक किलोमीटरसाठी अर्धा ते पाऊण तास, नागरिक त्रस्त

वाढते नागरीकरण, वाहनांची संख्या आणि अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीचा वेग मंदावला; मेट्रो, डीपी प्लॅनमधील रस्ते आणि पर्यायी मार्ग विकसित करण्याची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सुनील जगताप

पुणे: पुण्याचे मुख्य प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या हडपसर परिसरात वाढत्या नागरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत बिकट झाली आहे. पुण्याच्या पूर्व बाजूने शहरात येणाऱ्या वाहनांचा लोंढा प्रचंड असून, हडपसर चौक, सोलापूर रस्ता, सासवड रोड आणि मगरपट्टा परिसर येथे दररोज वाहनचालकांना त्रासाचा सामना करावा लागतो.

हडपसर परिसरातील नागरिकांसाठी वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वाढलेला वेळ ही एक अत्यंत गंभीर आणि रोजचीच डोकेदुखी बनली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि वाहनसंख्येमुळे हडपसरवासीयांच्या प्रवासाच्या वेळेवर विपरीत परिणाम झाला आहे. हडपसर गाडीतळ, रवी दर्शन चौक, पंधरा नंबर चौक, मगरपट्टा चौक, गांधी चौक, रामटेकडी उड्डाणपूल आणि सोलापूर महामार्गावर सकाळी व संध्याकाळच्या पीक अव्हर्समध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अनेक वर्षांपूर्वी मंजूर झालेली विकास आराखड्यातील रस्ते अद्याप अपूर्ण असल्याने सर्व वाहनांचा ताण मुख्य रस्त्यांवर येतो. उड्डाणपुलांखालील व रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग, फेरीवाले आणि रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहतूक अधिकच धीम्या गतीने चालते.

नागरिकांची मागणी

हडपसरकडून मुंढवा पूल आणि खराडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण राहिल्याने चाकरमान्यांचा तासनतास वेळ वाया जातो. या समस्येवर शाश्वत उपाय म्हणून मेट्रो प्रकल्पांचे काम वेगाने होणे, डीपी प्लॅनचे रस्ते पूर्ण करणे आणि प्रशासनाने कठोर वाहतूक नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून सतत केली जात आहे.

पूर्व भागात दोन ‘औद्योगिक वसाहत’

पूर्व भागातील हडपसर औद्योगिक वसाहत आणि रामटेकडी औद्योगिक वसाहत हा भाग पुण्याच्या औद्योगिक विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा राहिला आहे. हडपसर औद्योगिक वसाहतमध्ये लहान, मध्यम आणि मोठ्या स्वरूपाचे अंदाजे २०० ते ३५० हून अधिक उत्पादक, अभियांत्रिकी, ऑटो-कंपोनंट आणि पॅकेजिंग युनिट्स कार्यरत आहेत.

रामटेकडी औद्योगिक वसाहतमध्ये विविध प्रकारच्या अभियांत्रिकी कार्यशाळा, प्लास्टिक उद्योग, लॉजिस्टिक्स आणि अन्नप्रक्रिया करणाऱ्या अंदाजे २५० ते ४०० पेक्षा जास्त छोट्या व मध्यम व्यावसायिक कंपन्या व गोदामे आहेत. रामटेकडीचा परिसर हा प्रामुख्याने अभियांत्रिकी वर्कशॉप्स, यंत्रसामग्री निर्मिती, ऑटोमोबाईल दुरुस्ती, मेटल बेल्लोस निर्मिती, रासायनिक आणि पॅकेजिंग उद्योगांसाठी ओळखला जातो.

सोलापूर रोड ‘कॉरिडोअर’

हडपसर गाडीतळ, मगरपट्टा आणि आकाशवाणी केंद्रापासून हा विस्तार सोलापूर रस्‍त्याने हडपसर हद्दीपलिकडे पंधरा नंबर, शेवाळवाडीपर्यंत सलग जोडला गेला आहे. हडपसरवरून सासवड रस्त्याकडे जाताना भेकराईनगर, फुरसुंगीपर्यंत जोडला आहे, तर हांडेवाडी आणि उंड्रीपर्यंत मोठी रहिवासी संकुले उभी राहिली आहेत. हडपसरच्या उत्तर दिशेला मुंढवा आणि केशवनगरपर्यंत विस्तारला आहे.

सकाळी- संध्याकाळी वाहतूक कोंडी

सोलापूर रोड आणि हडपसर-कोंढवा-वानवडी परिसरातील या प्रमुख मार्गांवर आणि चौकांमध्ये दररोज ऑफिसच्या वेळी आणि संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होते. यामध्ये प्रामुख्याने सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ५:३० ते रात्री ९:३० पर्यंत वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

औद्यागिक वसाहतमध्ये असलेली ‘कामगार संख्या’

हडपसर औद्योगिक वसाहतमध्ये लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये मिळून प्रत्यक्षरीत्या अंदाजे १० ते १५ हजार कामगार, तंत्रज्ञ आणि अधिकारी कार्यरत आहेत. तसेच, रामटेकडी औद्योगिक वसाहतमध्ये छोटी अभियांत्रिकी कार्यशाळा , प्लास्टिक युनिट्स, गोदामे आणि फॅब्रिकेशनचे कारखाने असून या संपूर्ण पट्ट्यात अंदाजे १५ ते २० हजारपेक्षा जास्त कामगार आणि मजूर वर्ग कामाला आहेत.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनेक समस्या आहेत. त्यावर आम्‍ही मात करीत वाहतूक कोंडी सोडवत असतो. गाडीतळ आणि भाजी मंडई येथे उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि हातगाडी यांना शिस्‍त लावली असून अनधिकृत पार्किंगवर कारवाई करीत आहे. आगामी काळात हडपसर येथील उड्डाणपूल पाडणार असल्याने हडपसरचे पर्यायी रस्‍ते विकसित करण्याच्या सुचना मनपा प्रशासनाला दिल्या असून, त्‍यानंतरच पूल पाडण्यात येणार आहे. वेळोवेळी विविध उपाययोजना करून वाहतूक कोंडीमुक्‍त हडपसर करण्याचा आमचा प्रयत्‍न असतो.
अविनाश ढमे, सहायक पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस वाहतूक विभाग.
या परिसरात वाहतूक कोंडीबाबत कोणतीच उपाययोजना केलेली नाही. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून, वाहनांची संख्या वाढलेली आहे. एक किलोमीटर जायचे म्‍हटले तर अर्धा ते पाऊण तास जातो. त्‍यामुळे प्रशासनाने वाहतूक कोंडी सोडवत असताना पर्यायी रस्‍त्यांचा विचार करून ते रस्‍ते मोठे कसे करता येतील यावर तोडगा काढावा.
ॲड. सुरेश झुरुंगे, सामाजिक कार्यकर्ते, हडपसर गाव
वास्‍तविक पाहता हडपसरमध्ये उभारलेले उड्डाणपूल चुकीचे असून, तेच खरे वाहतूक कोंडीला कारणीभुत ठरत आहेत. तसेच हडपसरचा डीपी प्‍लॅन कागदावरच राहिला आहे. त्या डीपीप्रमाणे रस्‍त्यांचा विकास होणे आवश्यक आहे. प्रशासनाने अनधिकृत पार्किंगबाबत ठोस कारवाई अपेक्षित आहे. हडपसरमधील पर्यायी रस्‍त्यांचा विकास करणे आवश्यक आहे.
प्रशांत सुरसे, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT