पुणे : मेट्रो कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी शुक्रवारी (दि. 6) पीएमपी आणि पुणे मेट्रोच्या संयुक्त विद्यमाने कल्याणीनगर मेट्रो स्टेशन - मगरपट्टा सिटी कॅम्पस-गाडीतळ (हडपसर) या मार्गावर नव्या मेट्रो फीडर बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
दिवसभरात या बसच्या 28 फेर्या होणार आहेत. दिवसभरात दिलेल्या वेळेत दोन्ही बाजूने प्रत्येकी 45 मिनिटांनी बस प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे. हडपसर गाडीतळ, मगरपट्टा दवाखाना, मेगा सिटी, आयटी टॉवर नं.1, 3, 5, 9, 11 व 15, किर्तने बाग, मुंढवा गाव, कचरे वस्ती, कल्याणीनगर पुल, कल्याणीनगर मेट्रो स्टेशन या मार्गावर ही बस धावेल. या सेवेमुळे हडपसर, मगरपट्टा सिटी आणि कल्याणीनगर परिसरातील नागरिकांना मेट्रो स्थानकांशी थेट आणि जलद कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
पीएमपीच्या पर्यावरणपूरक ई-बसद्वारे ही सेवा पुरवण्यात येणार आहे. प्रवाशांनी या नवीन मेट्रो फीडर बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडे, पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर-पाटील, आणि मगरपट्टा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतिश मगर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतिश गव्हाणे, बीआरटी मॅनेजर तथा वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी नारायण करडे, भेकराईनगर डेपो मॅनेजर विजयकुमार मदगे, हडपसर डेपो मॅनेजर समीर आतार, वाघोली डेपो मॅनेजर सोमनाथ वाघोले यांच्यासह पीएमपी, मेट्रो व मगरपट्टा सिटीचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
हडपसर ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन - पहिली बस (हडपसरहून) : सकाळी 07.30 वा. - शेवटची बस (हडपसरहून): रात्री 07.35 वा.
कल्याणीनगर मेट्रो स्टेशन ते हडपसर : पहिली बस (कल्याणीनगर मेट्रो स्टेशनहून) - सकाळी 08.15 वा. - शेवटची बस (कल्याणीनगर मेट्रो स्टेशनहून) -रात्री 08.20 वा.