Fire Pudhari
पुणे

Pune Hadapsar Slum Fire: हडपसरमध्ये मध्यरात्री भीषण आग; १९ झोपड्या जळून खाक

राममनोहर लोहिया उद्यानाजवळील मजूर वसाहतीत दुर्घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी जीवितहानी टळली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: हडपसर भागातील राममनोहर लोहिया उद्यानाजवळ असलेल्या मजुरांच्या वसाहतीत शनिवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत 19 झोपड्या तसेच तीन दुचाकी जळून खाक झाल्या. आग लागल्यानंतर मजूर तसेच कुटुंबीय बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. मात्र, आगीमागचे कारण समजू शकले नाही.

पुणे-सोलापूर रस्त्यावर राममनोहर लोहिया उद्यानाच्या मागील बाजूस मजुरांची वसाहत आहे. येथील झोपड्या बांबू आणि पत्र्याचा वापर करून बांधलेल्या आहेत. मध्यरात्री अडीचच्या सुमारास वसाहतीमधील एका झोपडीला आग लागली. त्यात गृहोपयोगी साहित्याने पेट घेतल्यानंतर आग भडकली. नंतर शेजारी असलेल्या झोपड्यांनी पेट घेतला.

आग लागताच वसाहतीतील मजूर कुटुंबासह बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी चहुबाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

आगीत 19 झोपड्या व तीन दुचाकीही भस्मसात झाल्या. तसेच मजुरांचे कपडे, धान्य व अन्य साहित्य जळाले. मध्यरात्री आग लागल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, प्रसंंगावधान राखून मजूर आणि कुटुंबीय बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे, विलास दडस यांच्या मार्गदर्शनात जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

बोपोडीत भंगारमालाच्या दुकानात आग

बोपोडीतील छाजेड पेट्रोल पंपाजवळ असलेल्या भंगारमालाच्या दुकानाला शनिवारी पहाटे आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आगीत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. उन्हाळा सुरू झाल्यानंतर आग लागण्याच्या घटना वाढतात. उष्णतेमुळे आग भडकते. शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटना घडतात, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT