प्रभाग क्रमांक : 16 हडपसर-सातववाडी
हडपसर-सातववाडी प्रभागात (क्र. 16) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप या दोन्ही पक्षांची ताकद समतुल्य अशीच आहे. यामुळे या निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपत लढत होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने या निवडणुकीमध्ये एक वेगळी रंगत पाहायला मिळणार आहे.(Latest Pune News)
महापालिकेच्या 2017 च्या निवडणूकीत हडपसर गावठाण- सातववाडी हा प्रभाग क्रमांक 23 आता नवीन प्रभाग रचनेनुसार आता 16 झाला आहे. या प्रभागात पूर्वीच्या प्रभाग क्रमांक 22 चा काही भाग यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे या प्रभागाची लोकसंख्याही आता 92 हजार 232 इतकी झाली आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीचे योगेश ससाणे व वैशाली बनकर आणि भाजपच्या जंगले व मारुती तुपे यांचा समावेश होता. आता महायुतीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्र आहेत, मात्र, तरीही दोन्ही पक्ष पुन्हा आमने-सामने येणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवाराने मी निवडून कसा येईल, या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँगेस आणि भाजपची राजकीय ताकद या प्रभागात जवळजवळ समतोल आहे. मात्र राजकीय समीकरणे बदलल्याने एकाच पक्षातील उमेदवार निवडून येतील की, पूर्वी सारखीच स्थिती राहील, याचा अंदाज बांधणे सध्या तरी अवघड आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमधील फुटीचा फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसणार का आणि भाजपला त्याचा फायदा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपकडून संदीप दळवी, मारुती तुपे, युवराज मोहरे, नितीन होले, विजय मोरे, तर महिला वर्गातून स्मिता गायकवाड, सोनल कोद्रे, उज्वला जंगले, नलिनी मोरे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) वैशाली बनकर, वर्षा पवार, सुवर्णा जगताप, निर्मला विचारे, योगेश ससाणे, आदिनाथ भोईटे, सागर भोसले, कमलेश कापरे हे इच्छुक आहेत. शिवसेनेकडून (शिंदे गट) उल्हास तुपे, अभिमन्यू भानगिरे हे इच्छुक आहेत.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या माजी नगरसेवकांना ही निवडणूक सोपी नसल्याचीही चर्चा आहे. या प्रभागात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) यांचाही प्रभाव आहे. महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार की, प्रत्येक पक्ष स्वतंत्र उमेदवार देणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, मनसेसह महाविकास आघाडीची एकत्रित मोट भाजप, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कडवे आव्हान देऊ शकतात. महाविकास आघाडीतून वैभव डांगमाळी, प्रशांत सुरसे, नितीन आरु, गणेश फुलारे, विजय देशमुख, विनायक बोराटे, संजय सपकाळे, विद्या होडे यांच्या नावांची चर्चा आहे.
या प्रभागातून पंधरा वर्षांपूर्वी हडपसर विकास आघाडी बनवण्यात आली होती. त्या वेळी या आघाडीचे दोन उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत तिकीट नाकारलेले इच्छुक एकत्र येऊन वेगळा गट करून आघाडी करू शकतात, हे सुद्धा राजकीय पक्षांना विचारात घ्यावे लागणार आहे.