पुणे/ हडपसर: पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले. गेल्या सहा दिवसांत तीन प्रभागांमधून केवळ 56 अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला. मंगळवार शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत नामनिर्देशन अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे.
अनेक पक्षांनी उमेदवारांना गुपचूप बोलावून एबी फॉर्मचे वाटप सुरू केले. अनेक इच्छुकांनी हलगीचा कडकडाट आणि जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यास दाखल झाल्याने क्षेत्रीय कार्यालयाबाहेर जत्रेचे स्वरूप आले होते. मंगळवारी (दि. 30 डिसेंबर) सकाळपासूनच क्षेत्रीय कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती. वेळेची मर्यादा लक्षात घेता अनेकांची घाई गडबड दिसून आली. अर्ज स्वीकृती कक्षासमोर मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता, हमी रक्कम भरणे आणि प्रस्तावकांची उपस्थिती यासाठी उमेदवारांना धावपळ करावी लागली. विविध पक्षांसह अपक्षांची लक्षणीय संख्या दिसून आली. उमेदवार मोठ्या उत्साहात येत होते. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा फौज फाटा होता. केवळ उमेदवार, अनुमोदक व सूचक यांनाच प्रवेश दिला जात होता. मुख्य कार्यालयात गर्दी होती. दुपारी एकनंतर त्यात आणखी वाढ झाली.
दुपारी दोननंतर अर्ज भरण्यासाठी अवघा एक तास राहिला असताना अनेक उमेदवार धावपळ करत पोहोचले. शेवटची 45 मिनिटे असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे वेळेची उद्घोषणा केली. वेळ संपल्यानंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, अशी सूचना केली. अनेक कार्यकर्ते व उमेदवार शेवटच्या टप्प्यात अर्ज स्वीकारण्यासाठी व कागदपत्रे देण्यासाठी विनंती करताना दिसून आले.
इच्छुकांची प्रवेशद्वारावर गर्दी...
हडपसर-मुंढवा निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने जास्त गर्दी झाली होती. उमेदवारांबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर गर्दी केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी फक्त उमेदवारालाच प्रवेश दिला जात होता.
अन् पुन्हा ‘जिजाई’वर चक्कर...
हडपसर क्षेत्रीय कार्यालय.... दुपारी दीडची वेळ.... एबी फॉर्मवर प्रवर्गच बदलला.... उमेदवाराची घालमेल... एबी फॉर्म बदलण्याची घाई... प्रवर्ग बदलून द्या, नाही तर अपक्ष लढवतो असा थेट समोरच्याला दमच दिला... अन् अखेर कार्यकर्ता धावला जिजाई बंगल्यावर.... अन् एका तासात प्रवर्ग बदलल्याचा एबी फॉर्मही मिळाला.
कार्यकर्ते, पोलिस यांच्यात बाचाबाची...
हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये तीन ही प्रभागांतील इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी येत होते. त्यांच्याबरोबर काही उत्साही कार्यकर्त्यांचा लवाजमाही होता. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार उमेदवार, सूचना आणि अनुमोदक यांनाच परवानगी होती. परंतु प्रत्येक कार्यकर्त्याला उमदेवाराबरोबर फॉर्म भरण्याची घाई असल्याने कार्यकर्त्यांनी पोलिसांची हुज्जत घातली.
केवळ म्हणायला आघाडी अन् युती...
प्रभाग क्रमांक 15 आणि 16 मध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना गट यांच्यात युती, तर उबाठा, काँग््रेास आणि मनसे यांच्यामध्ये आघाडी झाल्याची चर्चा होती. मात्र, प्रभाग 16 मध्ये शिवसेना शिंदे गट, उबाठा, काँग््रेास आणि भाजपच्या सर्वच उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. अशीच परिस्थिती प्रभाग 15 मध्ये झाल्याने केवळ म्हणायला आघाड्या आणि अन् युती असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.
आज होणार उमेदवारांच्या अर्जांची छाननी
हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 15, 16 आणि 17 मधील इच्छुक उमेदवारांच्या अर्जांची छाननी आज बुधवारी (दि. 31 डिसेंबर) होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मारकड यांनी दिली. या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 15, 16 आणि 17 प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले असून, त्यांच्या अर्जांची छाननी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या अर्जांची छाननी होत असताना प्रथम प्रभाग क्रमांक 15 मधील अ, ब, क आणि ड प्रवर्गातील अर्जांची छाननी होणार असून, त्याप्रमाणेच प्रभाग 16 आणि 17 मधील उमेदवारांच्या अर्जांची छाननी होणार आहे.