Flyover  Pudhari
पुणे

Pune Flyover Repair: हडपसर जुन्या उड्डाणपुलाच्या 6 कोटी दुरुस्तीवरून महापालिकेत वाद

नवीन पूल तयार होत असताना जुन्या पुलावर खर्च कशासाठी? विरोधकांचा तीव्र सवाल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: हडपसर येथील जुन्या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 6 कोटी रुपये खर्च करण्याच्या महापालिकेच्या निर्णयावरून शुक्रवारी सर्वसाधारण सभेत जोरदार वाद झाला. नव्या पुलाचे नियोजन सुरू असताना, जुन्या पुलावर एवढा खर्च करण्याचे औचित्य काय, असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. या गदारोळानंतर महापौर मंजूषा नागपुरे यांनी या विषयावर स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश दिले.

सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून भैरोबा नाला ते यवतदरम्यान नवीन पूल उभारला जाणार असताना जुन्या पुलावर कोट्यवधींचा खर्च करणे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले. हा पूल लवकरच पाडला जाणार असेल, तर हा खर्च पुणेकरांच्या पैशांचा अपव्यय ठरेल, अशी टीकाही त्यांनी केली.

नगरसेवक अजित घुले यांनी पुलाच्या कामादरम्यान परिसरातील वाहतुकीवर होणारा ताण लक्षात घेऊन पर्यायी रस्ते व रुंदीकरणाची गरज अधोरेखित केली, तर प्रशांत तुपे यांनी पर्यायी व डीपी रस्ते पूर्ण होईपर्यंत, काम सुरू करू नये, असा इशारा दिला.

... म्हणून जुन्या पुलाची दुरुस्ती आवश्यक: गोजारे

यावर प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी खुलासा करताना सांगितले की, 2003 मध्ये उभारलेला हा पूल सध्या क्षमतेपेक्षा जास्त भार सहन करत आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनुसार दुरुस्ती आवश्यक असून, नवीन पुलाचे काम सुरू होण्यास किमान दीड वर्ष लागणार आहे. तोपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने दुरुस्ती अपरिहार्य आहे.

‌‘दुरुस्तीवर खर्च नको; डीपी रस्ते खुले करा‌’

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते नितीन गावडे यांनीही 8-9 महिन्यांत पूल पाडला जाणार असल्यास एवढा खर्च का, असा सवाल उपस्थित करत डीपी रस्ते तातडीने खुले करण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT