पुणे: मद्यधुंद कारचालकाने दिलेल्या धडकेत खासगी बसवरील चालकाचा मृत्यू झाला. कारचालकाने दिलेल्या धडकेत बसचालक कारच्या बोनेटवर पडला. त्याला काही अंतर कारचालकाने फरफटत नेले. तो खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावरून कार गेल्याने मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.12) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हडपसर- सासवड रोडवरील मामा-भांजे हॉटेलसमोर उरुळी देवाची परिसरात घडला आहे.
सागर बाळासाहेब सायकर (रा. शेवाळवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या ट्रॅव्हल्स चालकाचे नाव आहे. याबाबत विजय तानाजी शिर्के (वय 41, रा. सातववाडी, हडपसर) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालक कृष्णा गोपाळ कोईलवाड (वय 30, रा. बोथी, जि. लातूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि मयत यांच्या ट्रॅव्हल्स बस आहेत. ते चालक म्हणून काम करत होते. दोन ट्रॅव्हल्स घेऊन ते 12 एप्रिल रोजी रात्री वडकी येथून अक्कलकोटला जाणार होते.
हडपसर- सासवड मार्गावर दोन्ही ट्रॅव्हल्सच्या मध्ये एक एर्टिगा कार येऊन जागा देत नव्हती. त्यामुळे फिर्यादी यांनी ट्रॅव्हल्स बस थांबवून मागून येणाऱ्या त्या कारला थांबवून काय अडचण आहे, असे विचारले. त्या वेळी दारूच्या नशेत असणाऱ्या त्या कारचालकाने सायकर यांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यांना फरफटत नेले. बेक लावल्याने सायकर खाली पडले. त्यानंतर त्यांच्या अंगावरून पुन्हा कार घालून त्यांना गंभीर जखमी केले.
कारच्या धडकेत दाम्पत्य जखमी
रस्ता ओलांडताना भरधाव कारने दिलेल्या धडकेत दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना वाघोली येथील मानकर डोसा हॉटेलसमोर घडली. याबाबत विजयश्री प्रकाश दुरुगोजी (वय 30, रा. वाघेर मंदिराजवळ, वाघोली) यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या अपघाताबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या अपघातात आई विद्यावती प्रकाश दुरुगोजी (वय 56) आणि वडील प्रकाश हणुमंतप्पा दुरुगोजी (वय 65) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी एका कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.