गुंजवणी प्रकल्प मुख्य जलवाहिनी वर्षभरात पूर्ण करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश Pudhari
पुणे

Gunjawani Water Project: गुंजवणी प्रकल्प मुख्य जलवाहिनी वर्षभरात पूर्ण करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

आ. शिवतारे यांच्या मागणीला प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

Gunjawani water project update

सासवड: पुरंदर, भोर आणि वेल्हा तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पाच्या मुख्य जलवाहिनीचे काम पुढील वर्षभरात म्हणजेच जुलै 2026 पर्यंत पुर्ण करा तसेच उपवितरकांचे काम मार्च 27 पर्यंत पूर्ण झाले पाहिजे आणि या भागातील शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 15) दिले आहेत.

पुरंदर-हवेलीचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी विधिमंडळ अधिवेशनकाळात गुंजवणी प्रकल्पाबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती, त्यानुसार ही बैठक मंगळवारी मुंबईतील विधानभवन येथे पार पडली. (Latest Pune News)

गुंजवणी प्रकल्पाला सन 2019 मध्ये 1313 कोटी रुपये खर्चास मान्यता मिळाली होती. परंतु, कोविड आणि मधल्या काळातील कूर्मगतीमुळे प्रकल्प अनेक वर्षे लांबला. त्यामुळे प्रकल्पाच्या किमतीत वाढ होऊन जवळपास 1892 कोटी रुपये इतकी प्रकल्पाची किंमत झाली.

आजच्या बैठकीत या सुधारित रकमेच्या मान्यतेसाठी राज्य तांत्रिक सल्लागार परिषदेने 20 दिवसांत प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. याशिवाय मार्च 2027 पर्यंत प्रकल्पातील लघुवितरिका आणि उपवितरिका पूर्ण कराव्यात; जेणेकरून थेट शेतात पाणी पोहचेल, असेही निर्देश या वेळी देण्यात आल्याचे आमदार शिवतारे यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी माघार घेताना मी गुंजवणी, आयटी पार्क आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ, असे प्रकल्प मार्गी लावण्याच्या आश्वासनावर थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी ही बैठक झाली. एल अँड टी कंपनीला जलवाहिनीच्या कामासाठी सध्या निधीची अडचण भासू नये म्हणून आवश्यक तरतूद करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला आदेश दिलेले आहेत. याशिवाय कालबद्ध नियोजन करून प्रकल्प पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे गुंजवणीचे पाणी आता दृष्टिपथात येणार असून, तीनही तालुक्यांतील शेतकर्‍यांसाठी ही आनंदाची बाब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझा सुरू असलेला लढाही आता अंतिम टप्प्यात आला आहे.
- विजय शिवतारे, आमदार, पुरंदर-हवेली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT