

खोर: गट, गणांची संख्या जाहीर झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी वेग घेतला आहे. नवीन प्रारूप रचनेमुळे दौंड तालुक्यातील गट आणि गणांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तालुक्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. गेल्या वेळी तालुक्यात 6 गट व 12 गण होते. त्यात आता वाढ होऊन 7 गट आणि 14 गण करण्यात आले आहेत.
ही बदललेली रचना केवळ आकड्यांची नसून तालुक्यातील राजकीय दिशा ठरवणारी निर्णायक चाल ठरणार असल्याचे बोलले जात आहे. तालुक्याचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, अप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे यांच्यासाठी ही रचना संधी की संकट, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. (Latest Pune News)
विशेष म्हणजे नव्या गणरचनेनुसार मतदारसंघाची लोकसंख्या, भौगोलिक व्याप्ती आणि सामाजिक समतोल यामध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे याआधी संबंधित नेत्यांचे मजबूत गड समजले जाणारे भाग आता विखुरले गेलेत. त्यामुळे आतापर्यंत त्यांनी केलेल्या तयारीवर पाणी फिरले आहे. त्यामुळे त्यांना आता नव्याने प्रचार-आराखडे, स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची मांडणी करावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
दौंड तालुक्यात सध्या राजकीय उलथापालथीचा धुरळा उडालेला आहे. प्रत्येक पक्षाने अंतर्गत बैठका, मंथन व गुप्त रणनीतीला सुरुवात केली आहे. ही निवडणूक पारंपरिक वर्चस्वाच्या पुढे जाऊन नव्या नेतृत्वाच्या उदयाचे संकेत ठरेल, असे सांगितले जाते. दरम्यान, पुढील आठवड्यात निवडणूक आरक्षण जाहीर होण्याची चिन्हे वर्तवली जात आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार हे निश्चित आहे.
ही निवडणूक भविष्याचा नेता ठरवणारी
एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक नेत्यांचा कस लागणार आहे. ही निवडणूक केवळ पदांपुरती मर्यादित राहणार नसून भविष्यातील तालुक्याच्या राजकारणाचा चेहरा ठरवणारी असेल, असे जाणकार सांगतात. या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील इच्छुक किंवा नागरिक आताच्या प्रारूप रचनेबाबत हरकती घेणार का, ते कोणते मुद्दे उपस्थित करणार याकडे तालुक्याचे लक्ष आहे.
दौंड तालुक्यातील गट : राहू - खामगाव, पारगाव - वरवंड, गिरीम - गोपाळवाडी, कुरकुंभ-पाटस, देऊळगावराजे -खडकी, बोरीपार्धी-केडगाव, यवत - कासुर्डी.
दौंडमधील गण : राहू, खामगाव, पारगाव, कासुर्डी, गोपाळवाडी, गिरीम, वरवंड, कुरकुंभ, खडकी, देऊळगावराजे, यवत, केडगाव, बोरीपार्धी, पाटस.