Edible Oil Pudhari
पुणे

Edible Oil Prices: आखाती तणावाचा खाद्यतेल बाजारावर परिणाम; पुणेकरांना स्वस्त पर्यायांचा आधार घ्यावा लागू शकतो

आयातीवरील वाढते अवलंबित्व आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता; घरगुती बजेटवर परिणाम होण्याची चिन्हे

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: देशातील निम्म्या खाद्यतेलाची गरज आयातीवर अवलंबून असणे, देशाअंतर्गत अत्यल्प उत्पादन त्यातुलनेत खाद्यतेलाचा वाढता वापर या सर्वांचा परिणाम पुणेकरांच्या किचनमध्येही दिसण्याची शक्यता आहे. आखाती युद्धामुळे खाद्यतेलावरील वाढता खर्च लक्षात घेता पुणेकरांना किचनमधून येत्या काही दिवसांत सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन यांसारख्या दैनंदिन वापरातील खाद्यतेलांना बाजूला सारून त्या ऐवजी स्वस्त पर्यायांचा स्वीकार करावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

देशातील वाढते खाद्यतेल आयात अवलंबित्व आणि त्यासाठी खर्च होणारे अब्जावधी डॉलरचे परकीय चलन याबाबत चिंता व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या एकूण खाद्यतेल गरजेपैकी सुमारे 60 टक्के गरज आयातीद्वारे भागविली जात असल्याने दर वर्षी 18 अब्ज डॉलरहून अधिक परकीय चलन खर्च होत आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा थेट परिणाम पुण्यातील किरकोळ बाजारातील दरांवर दिसून येतो.

देशात 2024-25 या वर्षात तब्बल 16 दशलक्ष टन खाद्यतेल आयात करण्यात आले असून, त्यासाठी सुमारे 18.3 अब्ज डॉलर (सुमारे 1.61 लाख कोटी रुपये) खर्च झाला आहे. इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशनच्या अंदाजानुसार 2025-26 मध्ये भारताची खाद्यतेलाची गरज 26 दशलक्ष टनांच्या पुढे जाणार असून, देशांतर्गत उत्पादन केवळ 9.6 दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे 16.7 दशलक्ष टन खाद्यतेल आयात करावे लागणार आहे.

देशातील खाद्यतेलाची परिस्थिती

  • वार्षिक गरज 26 ते 27 दशलक्ष टन

  • देशांतर्गत उत्पादन 9.6 दशलक्ष टन

  • आयात 16 ते 16.7 दशलक्ष टन

  • आयात खर्च 18.3 अब्ज डॉलर

  • आयातीवरील अवलंबित्व सुमारे 60 टक्के

  • सर्वाधिक आयात पाम तेल

  • कोणत्या तेलाची किती आयात?

  • पाम तेल 8 ते 8.5 दशलक्ष टन

  • सोयाबीन तेल 5 ते 5.5 दशलक्ष टन

  • सूर्यफूल तेल 2.8 ते 3 दशलक्ष टन

  • इतर तेल सुमारे 2 लाख टन

मार्केट यार्डातील घाऊक बाजारातील खाद्यतेलांचे दर

खाद्यतेल (15किलो/ लिटर) शेंगदाणा तेल 2650-2900, रिफाईंड तेल 2300-3100, सरकी तेल 2150-2600, सोयाबीन तेल 2150-2600, पामतेल 2150-2450, सूर्यफूल रिफाईंड तेल 2350-2500, खोबरेल तेल 4000, वनस्पती 2050-2550 रु.

पुणे शहरातील किराणा बाजार, हॉटेल उद्योग, फास्टफूड व्यवसाय आणि घरगुती ग््रााहक मोठ्या प्रमाणात पामतेल, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलाचा वापर करतात. पामतेल हे इतर खाद्यतेलांच्या तुलनेने स्वस्त असल्याने घरगुती वापरापासून हॉटेल आणि खाद्यप्रक्रिया उद्योगात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे येत्या काळात सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यास ग््रााहक इतर स्वस्त पर्यायांकडे वळण्याची भीती आहे. त्यामुळे आयातीतील बदलांचा परिणाम स्थानिक बाजारावर त्वरित जाणवतो.
रायकुमार नहार, तेलाचे व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT