शंकर कवडे
पुणे : ताजा, सुकवून किंवा खारवून सुकवून खाल्ला जाणारा बांगडा मासा म्हणजे खवय्यांची चंगळच. रत्नागिरी तसेच गुजरातच्या किनारपट्टीवरून बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होणारे हे मासे स्थानिक बाजारपेठांमध्येच महागले आहेत. गुजरातच्या तुलनेत रत्नागिरीचे बांगडे जास्त महाग आहेत. त्यामुळे व्यापार्यांनी आपला मोर्चा गुजरातकडे वळविला आहे. परिणामी बाजारात सध्या गुजराती बांगड्यांचाच बोलबोला असल्याचे चित्र आहे.
गणेश पेठेतील मासळी बाजारात देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरून मासळी दाखल होते. सध्या बाजारात गुजराती बांगड्याची दररोज एक ते दीड टन एवढी आवक होत आहे. 20 किलोच्या क्रेटमधून ही मासळी बाजारात दाखल होत आहे. रत्नागिरीच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये बांगड्याचे किलोचे भाव 200 ते 240 रुपयांवर गेले आहेत, तर गुजरातमध्ये किलोचे भाव 140 ते 160 रुपये आहे. तेथून बाजारात माल येताना वाहतूक, पॅकिंगसाठी खर्च होऊन गुजराती बांगडा हा 180 ते 240 रुपये किलोपर्यंत जातो. गुजरातच्या तुलनेत रत्नागिरीचे भाव तिप्पट जात असल्याने व्यापारीवर्गाने रत्नागिरी बांगडा खरेदीकडे पाठ फिरविली आहे.
बांगड्याचे डोके मोठे व निमुळते असते. त्याचे डोळेही मोठे असतात. खालचा जबडा वरच्या पेक्षा किंचित पुढे आलेला दिसून येतो. तोंडाची फट खोल आणि खालच्या व वरच्या जबड्यांवर बारीक बारीक दात असतात. शरीर लांबट, निमुळते असते. विशेषतः दोन्ही बाजूंकडून शेपटीकडे ते सारखेच निमुळते होते जाते. पाठीवरील परातील पहिला काटा मोठा असून बाकीचे शेपटीकडे लहान होत जातात. शरीराचा रंग हिरवट काळा असतो. दोन्ही बाजूंच्या निळसर जांभळ्या रंगाला धातूसारखी चमक असते. गुजराती व रत्नागिरी बांगडा हे सारखेच असतात. मात्र, गुजराती बांगड्याला जास्त खवले असतात तर, रत्नागिरी बांगडयाला कमी प्रमाणात असतात. पाण्यातून काढल्यानंतर त्याचे खवले निघून जातात.
बांगड्यातील घटकद्रव्यांत सरासरी 20 टक्के प्रथिन असते. अकार्बनी द्रव्यात कॅल्शियम, फॉस्फरस व लोह असतात. मेदाचा अंश अत्यंत कमी किंवा मुळीच नसल्यामुळे हा मासा पचायला अतिशय हलका असतो.
रत्नागिरीच्या बांगड्याची खरेदी करणे हे सध्या व्यापारीवर्गासह खवय्यांना परवडणारे नाही. गुजराती बांगडा स्वस्त व खवय्यांनाही परवडणारा असल्याने व्यापारीवर्गाने गुजराती बांगडा खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. पुढील काही दिवस बाजारात गुजराती बांगडाच दिसून येईल.
– ठाकूर परदेशी, मासळी व्यापारी