दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटीकपातीच्या निर्णयाचे स्वागत; शेतकर्‍यांसह ग्राहकांनाही होणार फायदा Pudhari
पुणे

GST Cut on Dairy Products: दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटीकपातीच्या निर्णयाचे स्वागत; शेतकर्‍यांसह ग्राहकांनाही होणार फायदा

उलाढालवाढीस पोषक स्थिती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशातील दुग्धक्षेत्राला बळकटी देणारे महत्त्वपूर्ण निर्णय 56व्या जीएसटी परिषदेने 3 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत घेऊन दूध व दुग्धजन्य पदार्थांवरील करात आमूलाग्र बदल केले आहेत. या निर्णयाचे दुग्धवर्तुळातून स्वागत करण्यात येत असून, दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी करकपात शेतकर्‍यांसह ग्राहकांनाही फायदेशीर राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. बहुतांश दुग्धजन्य पदार्थ केवळ पाच टक्के कराच्या कक्षेत आणल्यामुळे उलाढाल वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जीएसटीच्या नव्या कररचनेची अंमलबजावणी 22 सप्टेंबर 2025 पासून होणार असून, त्यामधील कररचना पुढीलप्रमाणे असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ तथा महानंदचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर यांनी दिली. दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटीकपातीच्या निर्णयाचे स्वागत; शेतकर्‍यांसह ग्राहकांनाही होणार फायदा. (Latest Pune News)

त्यामध्ये अल्ट्रा हाय टेम्परेचर (यूएचटी) दूध - जीएसटी पाचवरून शून्य टक्के. पनीर -छेना (कमी फॅटचे पॅकबंद व लेबल असलेले ) जीएसटी पाच वरून शून्य टक्के करण्यात आला आहे. तर लोणी, तूप व डेअरी स्प्रेड्सवरील 12 टक्के जीएसटी पाच टक्के करण्यात आला आहे. चीज 12 वरून 5 टक्के, कंडेन्स्ड मिल्कही 12 वरून 5 टक्के, दुधाचे कॅन 12 वरून 5 टक्के तर आईस्क्रिमवरील 18 टक्के कर 5 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला आहे.

नवीकरणीय ऊर्जा उपकरणांवरील जीएसटी 12 वरून 5 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. यामध्ये बायोगॅस प्लांट्स, सौर पीव्ही सेल्स, सौर वॉटर हीटर्स आणि संबंधित प्रणालींचा समावेश आहे. सहकारी दुग्धक्षेत्रात नवीकरणीय ऊर्जा व गोबर आधारित बायोगॅसचा वापर आणखी व्यापक होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पनीरवर पूर्वी पाच टक्के कर असताना पॅकिंग-खोके, मशिनरी आदी इनपुटवर कर वजा करायचे. आता शून्य टक्के करामुळे वजावट मिळणार नसल्याने शून्य कराचा प्रत्यक्ष फायदा दर कमी होण्यावर दिसणार नाही. मात्र, दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी दरातील कपातीचा निर्णय स्वागतार्ह आहे. तशी मागणी सातत्याने दुग्ध वर्तुळातून करण्यात येत होती. आईस्क्रिमवरील कर 18 वरून 5 टक्क्यांवर आणल्याने दर कमी होतील.
- श्रीपाद चितळे, संचालक चितळे दूध
केंद्राच्या जीएसटी दर कपातीच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ होण्यास मदत होईल. ग्राहकांनाही पूर्वीच्या तुलनेत स्वस्त दरात उपपदार्थ उपलब्ध होतील. त्यामुळे ग्राहकांकडून मागणीत वाढ झाल्यास सहकारी दूध संघाच्या उलाढालीत वाढ होण्यास मदत होईल.
- अ‍ॅड. स्वप्निल ढमढेरे, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज दूध)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT