पुणे : जीएसटी करसंकलन वाढत आहे, ही बाब चांगली आहे. मात्र, यातही इनपुट क्रेडिट टॅक्स प्रकारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत आहेत, ते रोखले पाहिजेत असे आवाहन जीएसटीच्या पुणे विभागाचे प्रधान आयुक्त मयंक कुमार यांनी केले.
वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीत सनदी लेखापालांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी 'जीएसटी' कायद्यात बदल केले जात आहेत.
सनदी लेखापालांना हे नवे बदल समजून घेण्यासाठी अशा प्रकारच्या परिषदा उपयुक्त ठरतात, असे मत केंद्रीय जीएसटी तथा कस्टम विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त मयंक कुमार यांनी व्यक्त केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) जीएसटी अँड इन्डायरेक्ट टॅक्स कमिटीच्या वतीने आणि आयसीएआय पुणे शाखेच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मंगळवारी मयंक कुमार यांच्या हस्ते झाले.
म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँक्वेट्स येथे झालेल्या या कार्यक्रमात जीएसटी कमिटीचे उपाध्यक्ष उमेश शर्मा, केंद्रीय समिती सदस्य चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य रेखा धामणकर, अभिषेक धामणे, राजेश अग्रवाल, पुणे शाखेचे अध्यक्ष सचिन मिणियार, उपाध्यक्ष प्रणव आपटे, उपस्थित होते.