Impact Of GST Rate on Books Price in Maharashtra
पुणे: अनेक ग्राहपयोगी वस्तूंचे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कमी केल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे त्यांच्या विचारपोषणासाठी असणाऱ्या पुस्तकांसाठीच्या कागदावरील जीएसटी कर थेट 12 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांपर्यंत आश्चर्यकारकरित्या वाढविण्यात आला असून, त्यामुळे पुस्तकांच्या किमती अंदाजे 15 ते 20 टक्क्यांनी वाढणार असल्याने पुस्तकप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
पुस्तक म्हणजे ज्ञानार्जनाचे साधन आहे. तरुणापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण वेळ काढून विविध विषयांवरील पुस्तके वाचतात. प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यात छापील पुस्तक हे खूप महत्त्व ठेवते.
महाराष्ट्रचे चित्र पाहिले तर कथा, कादंबरी, कविता अशा पुस्तकांची निर्मिती करणाऱ्या 300 ते 350 प्रकाशन संस्था महाराष्ट्रात आहेत. या संस्थांची वार्षिक उलाढाल 200 कोटी रुपयांपर्यंत आहे. दररोज प्रकाशनविश्वात नवीन पुस्तकांची भर पडत असते. पण, पुस्तकांसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या कागदावरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) 12 वरून 18 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फटका प्रकाशक संस्थांना सहन करावा लागणारच आहे. पण, त्यामुळे पुस्तकांच्या किमतीतही वाढ होणार असून, पुस्तकांसाठीच्या कागदावरील जीएसटी कमी करण्याची मागणी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची आहे.
पुस्तकांच्या कागदावरील जीएसटी वाढविण्यात आल्याचा फटका प्रकाशकांनाही बसणार आहे. त्यामुळे पुस्तकांच्या किमती सहाजिकच वाढवाव्या लागतील. पुस्तकांच्या कागदावरील जीएसटी कमी करावा, अशी आम्हा प्रकाशकांची मागणी आहे. पुस्तके ही करमणुकीची नाहीतर ज्ञान देणारे साधन आहे. पुस्तक खरेदी ही चैनीची गोष्ट नाही. त्यामुळे पुस्तकांच्या किमती जर वाढल्या तर वाचकांना पुस्तक विकतघेणे आवाक्याबाहेर जाईल. म्हणून जीएसटी कमी करण्यात यावा.सुनीताराजे पवार, संस्कृती प्रकाशन
प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे म्हणाले, पुस्तकांसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या कागदावरील जीएसटी 12 वरून 18 टक्के करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रकाशन व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. पुस्तकांच्या किमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढणार आहेत. दिवाळीनंतर जी नवीन पुस्तके दुकानांमध्ये विक्रीसाठी आलेली आहेत, त्याच्या किमती वाढलेल्या दिसतील.कागदावरील कर पूर्णत: रद्द करावा किंवा जास्तीत जास्त पाच टक्के आकारावा, अशी विनंती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे निवेदनाद्वारे असून, त्याबाबत काय निर्णय होतो याची वाट पाहत आहोत. जीएसटी आकारण्याला मराठी प्रकाशक संघाची हरकत नाही, पण तो अधिकाधिक 5 टक्के असावा, ज्या योगे उत्तमोत्तम साहित्यकृती तसेच ज्ञान देणाऱ्या पुस्तकांचे मूल्य मर्यादित राहून सर्व सामान्य वाचकांना याचा लाभ घेता येईल.
पुस्तकाच्या किंमती कशाच्या आधारावर ठरतात?
पुस्तकांच्या कागदाच्या संख्येनुसार, कागदाच्या रंगानुसार, मांडणीनुसार पुस्तकांच्या किमती ठरतात. एका छोट्या पुस्तकाची किमत 100 ते 200 रुपये, कादंबरीची किमत साधारणपणे 200 ते एक हजार रुपयांपर्यंत असते. तर कवितासंग्रहाची किमत अंदाजे 100 ते 500 रुपये असते.