मंचर : केंद्र सरकारने बिल्डिंग मटेरिअलवरील जीएसटी कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहचलेला नाही. दुकानदार आणि ग्राहक यांच्यात बाजारभाव कमी न झाल्याबद्दल शाब्दिक चकमक उडत आहे.(Latest Pune News)
सिमेंटवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणि मार्बलवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. मात्र, उत्पादक कंपन्यांनी आपल्या मूळ किमतीमध्ये वाढ केल्याने बाजारात सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्याचे दर पूर्वीप्रमाणेच आहेत.
सध्या सिमेंटच्या एका बॅगेची किंमत 300 ते 330 रुपयांदरम्यान असून, जीएसटी कमी झाल्यानंतरही कोणत्याही बाजारभावात फरक पडलेला नाही. दरवाढीमुळे ग्राहक नाराज झाले असून, अनेक ठिकाणी दुकानदारांशी हुज्जत घालत असल्याचे चित्र दिसत आहे.
केंद्र सरकारने ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू मिळाव्यात, यासाठी जीएसटी कपात केली होती. परंतु, कंपन्यांनी उत्पादन खर्च वाढल्याचे कारण देत दर वाढविले आहेत. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचा वास्तविक लाभ ग्राहकांपर्यंत पोहचू शकलेला नाही. बांधकाम क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण असून, ग्राहक आणि विक्रेते दोघेही गोंधळात पडले आहेत. सरकारने जीएसटी कमी केल्याचे ऐकून आम्ही बांधकाम साहित्य स्वस्त होईल, असे गृहीत धरले होते. परंतु, अजूनही सिमेंटचे दर तसेच आहेत. कंपन्यांनी वाढविलेले रेट आमच्यासाठी परवडणारे नाहीत. कंपन्यांनी मूळ दर वाढविले म्हणून आम्हाला देखील जुन्याच दराने विक्री करावी लागते. जीएसटी कमी झाला तरी फायदा आम्हाला किंवा ग्राहकांना मिळालेला नाही. सगळी वाढ कंपन्यांच्या हातात आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.