महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली File Photo
पुणे

Pune Politics: महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातील एका गटाने पुन्हा शहराध्यक्ष बदलासाठी उचल खाल्ली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातील एका गटाने पुन्हा शहराध्यक्ष बदलासाठी उचल खाल्ली आहे. पुण्याचे निरीक्षक सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासमोर शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या मंडळींनी लॉबिंग केले, तर विद्यमान अध्यक्षांनाच कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आली.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी सोमवारी काँग्रेस भवनात पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी काही पदाधिकार्‍यांशी खासगीत चर्चा करून आगामी पालिका निवडणुकीत पक्षाची सत्ता आणण्यासाठी काय करता येईल, हे जाणून घेतले. (Latest Pune News)

या वेळी काही पदाधिकार्‍यांनी शहराध्यक्षबदलाची मागणी केल्याचे समजते. काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष म्हणून अरविंद शिंदे कार्यरत असून, विधानसभा निवडणुकीच्या वेळीही या गटाने शहराध्यक्ष बदलासाठी मोठे लॉबिंग केले होते. तथापि, त्या वेळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर बदल नको, अशी भूमिका घेतल्याने त्यांना गप्प बसावे लागले होते.

आता संघटनात्मक बदलांच्या पाहणीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीनेच बंटी पाटील यांना पुण्यात पाठविले असल्याने या गटाने पुन्हा उचल खाल्ली आहे. वास्तविक, मार्च महिन्याच्या सुरुवातीस ते पुण्यात येऊन गेले होते व महिना अखेरीला पुन्हा येणार होते. तथापि, पक्षश्रेष्ठींकडून पुण्याच्या अहवालाबाबत तगादा लावल्याने आज सायंकाळी ते तातडीने पुण्यात आले, असे समजते.

पाटील यांनी सायंकाळपासूनच काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींना सुरुवात केली असून, अनेकांनी त्यांच्या वैयक्तिक भेटी घेऊन पक्षसंघटना व नेतृत्वबदलाबाबतची मते व्यक्त केली आहेत. तर, काहींनी शिष्टमंडळासह त्यांची भेट घेऊन आपली मते मांडली आहेत. रात्री उशिरापर्यंत या चर्चा व गाठीभेटी सुरू होत्या.

सुनील मलके, अविनाश बागवे आणि संजय बालगुडे या नेत्यांनीही त्यांची भेट घेतली असून, शहराध्यक्षपदासाठी हे तिघेही इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर एका गटाने चंदू कदम आणि अजित दरेकर यांचे नाव पुढे केल्याचे समजते. त्या वेळी ज्यांना महापालिका निवडणूक लढवायची नाही, त्यांना अध्यक्षपदाची संधी द्यावी, अशी मागणी काही पदाधिकार्‍यांनी केल्याचे समजते.

दरम्यान, पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते व मने जाणून घेऊन तसेच पक्षसंघटना मजबुतीसाठी आणि निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी योग्य असलेल्या व्यक्तीचीच निवड करावी, असे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT