पुणे: खासगी रुग्णालयांच्या नियमबाह्य कृत्यांबद्दल तक्रारी नोंदविण्यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी तक्रार निवारण कक्ष स्थापन केला. गेल्या पाच महिन्यांत निवारण कक्षाकडे केवळ 10 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
यामध्ये अवाजवी बिल आकारणे, योजनांचा लाभ न मिळणे, कर्मचार्यांचे उर्मट वर्तन. अशा तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय नागरिकांकडून अल्प प्रमाणात ऑनलाइन तक्रारीही प्राप्त होत आहेत. (Latest Pune News)
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे तक्रार निवारण कक्षाचा 18002334151 हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला. काही वेळेला क्रमांक ’नॉट रिचेबल’ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये टोल फ्री क्रमांक दर्शनी भागात लावला नसल्याने तक्रार निवारण क्रमांकावर फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्णांकडून अवाजवी बिल लावणे, योग्य उपचार केले न जाणे, योजनांचा लाभ न मिळणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
महाराष्ट्र शुश्रूषागृहे नोंदणी नियम 2021 शासन अधिसूचना 14 जानेवारी 2021 रोजी राज्यातील रुग्णालयांना लागू केली आहे. यानुसार महापालिकेत आरोग्य विभागाने तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे.
यामध्ये खासगी रुग्णालयांमधील अतिरिक्त बिल, रुग्ण हक्कांची पायमल्ली, दरपत्रके आदी नियमबाह्य कृत्यांबद्दल तक्रार नोंदविता येते. त्यासाठी 18002334151 हा टोल फ्री क्रमांक कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायंकाळी 6.15 पर्यंत कार्यान्वित असतो. या क्रमांकावर फोनवरूनही तसेच प्रत्यक्षातही देखील तक्रार दाखल करता येते.
काय आहे तक्रारींचे स्वरूप?
अवाजवी बिल आकारणे
योजनांचा लाभ न मिळणे
बिलासाठी मृतदेह अडवून ठेवणे
रुग्णालयांतील कर्मचार्यांचे उध्दट वर्तन
विम्याचा लाभ मिळण्यात अडचणी
गर्भधारणा चाचणीसाठी 5 हजार रुपयांचे बिल लावणे
खासगी रुग्णालयांबाबत तक्रार निवारण कक्षामध्ये तक्रारी आल्यास वैद्यकीय अधिकार्यांकडून पत्र पाठविले जाते आणि त्यांची बाजू जाणून घेतली जाते. पाहणीमध्ये त्रुटी आढळून आल्यास नोटीस पाठवली जाते. सर्व रुग्णालयांनी नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका