नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या द्राक्ष बागांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर यांनी जिल्हाधिकारी यांना द्राक्ष पाहणी अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पंचनाम्यांचे आदेश दिले आहेत. आता महसूल, पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी विभागाच्या वतीने पंचनामे सुरू झाले आहेत.(Latest Pune News)
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला छाटणी झालेल्या बहुतेक द्राक्ष बागांमध्ये घडनिर्मिती झाली नाही. त्यामुळे तालुक्यातील 70 ते 80 टक्के द्राक्ष उत्पादकांचा हंगाम वाया जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या द्राक्ष बागांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यास मात्र कृषी विभागाने नकार दिला होता. त्यावर याबाबत माजी आमदार अतुल बेनके यांनी द्राक्ष उत्पादकांशी चर्चा केली. त्यानंतर बेनके यांच्या पुढाकारातून द्राक्ष उत्पादकांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा केली होती.
यानंतर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी तातडीने द्राक्ष बागांची पाहणी करून अहवाल सादर करावा. त्यानंतर पंचनामा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा, असा आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. त्यानुसार आता नुकसानग््रास्त बागांचे पंचनामे सुरू झाल्याचे तहसीलदार सुनील शेळके यांनी सांगितले.
हंगाम वाया जाणार असल्याने द्राक्ष बागांच्या संगोपनासाठी वर्षभर केलेला एकरी तीन लाख रुपये खर्च वाया जाणार आहे. शासनाकडून एकरी 9 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. झालेल्या भांडवली खर्चाचा विचार करता शासनाकडून मिळणारे अनुदान म्हणजे चेष्टा आहे. त्यामुळे शासनाने अधिकचे पॅकेज द्राक्ष उत्पादकांना द्यावे.गुलाब दरेकर, द्राक्ष उत्पादक, गुंजाळवाडी
एकरी 9 हजार रुपयांप्रमाणे जास्तीत जास्त तीन हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष बागांना अनुदान मिळू शकते. तालुक्यात 1 हजार 116 हेक्टर क्षेत्रात द्राक्ष बागा आहेत. शासकीय नियमानुसार सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्षात एकत्रित माहिती संकलित झाल्यावर अधिकृत आकडा नुकसानीचा समजू शकेल. अतिवृष्टीने जुन्नरमधील नुकसान झालेल्या द्राक्ष बागांचे पंचनामे करताना अधिकारी.गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी, जुन्नर