Gopichand Padalkar love jihad law
यवत/ खुटबाव: लव्ह जिहाद आणि लँड जिहाद रोखण्यासाठी फडणवीस सरकार कायदा आणणार आहे, असे वक्तव्य भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. ते दौंड तालुक्यातील यवत गावच्या हद्दीतील नीळकंठेश्वर मंदिरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ यवतमध्ये गुरुवारी (दि. 31 जुलै) हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पडळकर बोलत होते. या वेळी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, किन्नर आखाड्याचे साध्वी हेमांगी साखी आदी उपस्थित होते.
आ. पडळकर पुढे म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात लव्ह जिहाद आणि लँड जिहादची प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत, त्यामुळे याविरोधात कठीण कायदा करणे गरजेचे आहे, म्हणून आम्ही याबाबत कडक कायदा आणणार आहोत. हे सरकार सत्तेत आल्यापासून हिंदूंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे. (Latest Pune News)
हिंदू समाज हे एक घर असून, जाती ह्या खोल्या आहेत. हिंदू धर्माचा बाप छत्रपती शिवाजी महाराज असतील, तर त्यांच्या मूर्तीची विटंबना करणार्यांना चोख उत्तर देण्याची जबाबदारी आपली आहे. शिवाजी महारांजाच्या मूर्तीवर झालेला आघात हा अखंड हिंदुंवर झालेला आघात आहे.
हे सरकार फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेणारे नसून, त्यांच्या विचारावर चालणारे सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणार्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पडळकर यांनी या वेळी केली. मालेगाव बॉम्बस्फोटच्या निकालात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची निर्दोष मुक्तता झाल्याने काँग्रेस सरकारची ’भगवा दहशतवाद’ ही घोषणा फोल ठरली असून, कॉग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागावी.
या वेळी आ. संग्राम जगताप म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होऊन तीन दिवस उठून गेले तरी आपला हिंदु समाज शांत बसला, हिंदु समाजाने शांत बसणे योग्य नाही. यवत परिसरात असणार्या मशिदींना कायदेशीर परवानगी नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.
हिंदू समाजाने भगव्या ध्वजाच्या खाली येऊन एकी दाखवणे गरजेचे आहे, त्यासाठी लव्ह जिहाद आणि लँड जिहाद कायदा होणे गरजेचे आहे. भारत राष्ट्र हिंदू राष्ट्र जगाच्या नकाशावर झाले पाहिजे. त्यासाठी काम करणे गरजेचे आहे. या वेळी या सभेला मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव उपस्थित होते.
दौंड बंदला प्रतिसाद
यवतच्या घटनेप्रकरणी गुरुवारी संपूर्ण दौंड तालुक्यात बंद पुकारण्यात आला होता. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यात यवत, केडगाव, वरवंड, राहू या मोठ्या बाजारपेठेत बंदमुळे शुकशुकाट पाहायला मिळाला.