पुणे

pune porsche accident : अपघातादिवशी मद्य प्यायल्याची अल्पवयीन मुलाची कबुली

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघाताबाबत अल्पवयीन मुलाकडे पुणे पोलिसांनी चौकशी केली. अल्पवयीन मुलाने अपघातादिवशी मद्य पिल्याची व त्या दिवशी मी शुद्धीत नसल्याची कबुली दिली असल्याची चर्चा रंगली असताना वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी असे काहीही चौकशीदरम्यान घडले नसल्याचे म्हटले आहे. कल्याणीनगर येथे भरधाव गाडीने दिलेल्या धडकेने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना 19 मे रोजी घडली होती. बाल न्याय हक्क मंडळाने 31 मे रोजी पोलिसांना अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी दिली होती. पुणे पोलिसांनी शनिवारी (दि. 1) बालगृहात अल्पवयीन मुलाच्या आईच्या उपस्थितीत चौकशी केली.

या वेळी आपण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे अल्पवयीन आरोपीने कबूल केले आहे. तसेच अपघाताबद्दल फारसे काही आठवत नसल्याचे देखील संबंधित मुलाने पोलिस चौकशीदरम्यान सांगितल्याची चर्चा आहे. घटनेच्या रात्री दोघेही कारच्या मागच्या सीटवर बसले होते आणि अल्पवयीन आरोपी मद्य प्राशन करून भरधाव वेगाने गाडी चालवत होता, अशी माहिती अल्पवयीन आरोपीच्या मित्रांनी पोलिसांना दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत पुणे पोलिसांकडून कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT