Gold Market Update
पुणे: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे गेले काही दिवस सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी (दि. 22) 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 97,780 रुपयांवर गेला. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) तीन टक्के रकमेसह पुण्यात सोन्याचा भाव 1 लाख 713 रुपये झाला आहे. दिवसभरात सोन्याच्या भावात दहा ग्रॅममागे एक हजार रुपयांची वाढ झाली.
अमेरिकेने पुकारलेल्या व्यापारयुद्धामुळे अस्थिरता निर्माण झाल्याने जगभरातील गुंतवणूकदार सोन्यात (Gold) गुंतवणूक करत आहे. तर, चीनने गोल्ड बाँड प्रत्यक्ष सोन्यात परावर्तित करण्यास सुरुवात केली आहे.
परिणामी, सोन्याची मागणी वाढल्याने भावाने उसळी घेतली आहे. सोन्याचे दागिने 22 कॅरेटमध्ये तयार केले जातात. या सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 91 हजार 910 रुपयांवर गेला आहे. तर, जीएसटीच्या रकमेसह 94,667 रुपये भाव आहे. चांदीचा एका किलोचा भाव 96 हजार 800 रुपये असून, जीएसटीसह 99 हजार 704 रुपये मोजावे लागत आहेत.
सराफा व्यावसायिक नितीन अष्टेकर म्हणाले, व्यापारशुल्काच्या वाढीमुळे जगभरात अस्थिरता निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळच्या सत्रात 24 ग्रॅम सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 99 हजार 700 रुपयांवर गेला होता. मात्र, बाजार बंद होताना 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 97 हजार 780 रुपयांवर आला, तर 22 कॅरेटचा भाव 91 हजार 910 रुपयांवर आला. यात जीएसटीची तीन टक्के रक्कम गृहीत धरलेली नाही.
अडीच वर्षांत दुप्पट दर
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठत दिवसात 1348 रुपयांची वाढ नोंदवली. यामुळे सोने प्रति दहा ग्रॅम एक लाख एक हजार 148 रुपयांवर पोहोचले आहे. सोमवारी राजधानी दिल्लीत सोन्याचा दर जीएसटी वगळून 99 हजार 800 रुपये होता.
गत अडीच वर्षांत 100 टक्के म्हणजेच दुप्पट वाढ नोंदवली असून जागतिक बाजारात 10 ऑक्टोबर 2022 रोजी सोन्याचा दर प्रति औंस 1,704 होता, जो 22 एप्रिल 2025 रोजी 3,470 पर्यंत पोहोचला असून दोन वर्षे आणि सहा महिन्यांतच किंमत दुप्पट झाली आहे. भारतामध्ये आज (22 एप्रिल) स्पॉट गोल्ड रेट प्रति 10 ग्रॅमसाठी 99,000 आहे. जुलै 2022 मध्ये हा दर 50,000 होता. म्हणजेच सुमारे 100 टक्के वाढ झाली आहे.
कमोडिटी मार्केटमध्येही मोठी तेजी
एमसीएक्सवर (कमोडिटी मार्केट) ऑक्टोबर कॉन्ट्रॅक्ट 1,00,500 वर पोहोचला असून पहिल्यांदाच सोन्याने एक लाखाचा टप्पा पार केला आहे. ही वाढ 1,666 म्हणजेच 1.69 टक्केने झाली आहे. आजचा एमसीएक्स स्पॉट प्राईस 98,874 असून, इंट्राडे उच्चांक 99,358 आहे.
कारणे काय?
अमेरिकेतील राजकीय अस्थिरता, जागतिक व्यापार युद्धाचा भडका, चीनकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी, डॉलरचे मूल्य दिवसेंदिवस कोसळतेय.
आणखी वाढ शक्य
सोन्याच्या किमती अजून वाढू शकतात, असा या क्षेत्रातील विश्लेषकांचा अंदाज आहे. 2026 पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 3,600 प्रति औसपर्यंत जाऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. अमेरिका-चीन व्यापारयुद्ध आणि डॉलरचे घसरते मूल्य याचा हा परिणाम आहे.